अहिल्यानगरमधील ‘या’ मोठ्या पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखोंची फसवणूक ! संचालक मंडळासह १२ जणांवर गुन्हा

Published on -

ठेवीदारांकडून मुदत ठेव म्हणून घेतलेली रक्कम व त्यावरील व्याज मुदत संपल्यानंतरही देण्यास टाळाटाळ करत ठेवीदारांची ४२ लाख ७ हजार ७१० रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळासह १२ जणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ठेवीदार अमेय रमेश मुदकवी (वय ५०, रा. गृहशिल्प सोसायटी, बागरोजा, दिल्ली गेट, अ.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्था ही जळगाव येथील आहे. या पतसंस्थेने काही वर्षांपूर्वी नगर शहरात जुन्या कोर्टासमोरील करण कोर्ट अपार्टमेंट येथे शाखा सुरु केली होती. या शाखेत फिर्यादी मुदकवी यांचे वडील रमेश विष्णुपंत मुदकवी यांचे व त्यांची आई उज्वला यांचे बचत खाते होते. फिर्यादी व त्यांचा भाऊ निखिल यांनी सर्वांनी मिळून बचत केलेली रक्कम या शाखेत मुदत ठेव म्हणून जमा केली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे खाते हे फिर्यादी यांच्या नावावर वारसा हक्काने आले.

५ नोव्हेंबर २०२२ ते १९ डिसेंबर २०२४ दरम्यान फिर्यादी यांची आई व भाऊ या सर्वांनी मिळून पतसंस्थेत ४२ लाख ७ हजार ७१० रुपये एवढी रक्कम गुंतवणूक केली. या गुंतवणुकीच्या मुदत ठेव पावत्या पतसंस्थेने फिर्यादी यांना दिल्या. ठेवीची मुदत संपल्यानंतर फिर्यादी यांनी त्यांची गुंतवणूक केलेली रक्कम पतसंस्थेकडे मागितली असता पतसंस्थेच्या संचालकांनी तुम्हाला देण्याकरिता पुरेशी रक्कम उपलब्ध नाही. पैसे उपलब्ध झाल्यानंतर तुमची रक्कम तुम्हाला व्याजासहित देण्यात येईल असे सांगितले.

तसेच त्यांना त्यांची सर्व रक्कम रिकअरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवण्याची गळ घातली व त्याची मुदतही संपली. त्यामुळे फिर्यादी व इतर ठेवीदार पैसे मागणेकरिता पतसंस्थेत गेले असता ८ दिवसात पैसे देऊ असे सांगून त्यांना परत पाठवले. त्यानंतर ठेवीदारांनी पतसंस्थेकडे वारंवार पैशाची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन पैसे देण्यास टाळाटाळ केली. यावरुन पतसंस्थेचे संचालक यांनी फिर्यादी व इतर ठेवीदारांचा विश्वास संपादन करून त्यांचे ४२ लाख ७ हजार ७१० रुपये एवढी मुदत ठेव रक्कम व्याजासहित न देता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अमेय मुदकवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सत्यशील अविनाश अकोले, अनुप सत्यशील अकोले, शिल्पा शाम अकोले, शीतल सत्यशील अकोले, श्याम अविनाश अकोले (रा. पूर्णवाद नगर, रिंग रोड, जळगाव), बंडू गणेश लोखंडे (रा.आंबेडकर नगर, सावदा, ता.रावेर,जि.जळगाव), महेंद्र मनोहरलाल शर्मा (रा.आठवडे बाजार, बुऱ्हाणनगर रोड, रावेर, जि. जळगाव), जितेंद्र कृष्णमूर्ती कुलकर्णी (रा.सहकारनगर, सावेडी, अ.नगर), नितीन शंकर राणे, विजय शंकर राणे (दोघे रा.क्रांती चौक, सावदा, ता.रावेर जि.जळगाव), नामदेव पांडुरंग कोळी (रा.विठ्ठलनगर, जळगाव), महेश सुधाकर कुलकर्णी (रा.गोडाऊन जवळ, केडगाव, अ.नगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड हे करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe