अहिल्यानगरमध्ये थरारक हत्या ! गिफ्टचं आमिष दाखवून कोयत्याने महिलेचे शिर धडापासून वेगळे…खून करून आरोपी प्रियकर पोलीस ठाण्यात

या घटनेची माहिती मिळताच, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला.

Ahmednagarlive24
Published:

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वांबोरी गावात एका महिलेचा अमानुषपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंचमुखी महादेव मंदिराच्या शेजारील डोंगराजवळ महिलेचे शिर धडापासून वेगळे करण्यात आले. विशेष म्हणजे, खून केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली.

पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली

ही घटना बुधवार, 19 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 7:30 वाजता घडली. या प्रकरणात सोनाली राजू जाधव (वय 28, रा. पोखरी, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव असून, सखाराम धोंडीबा वालकोळी (वय 53, रा. निरगुडसर, ता. आंबेगाव, जि. पुणे) या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिल्याने, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

मृत महिलेशी विवाहबाह्य संबंध

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सखाराम वालकोळी हा पूर्वी मुंबई महापालिकेत नोकरीला होता. त्याला पाच मुली आहेत. काही वर्षांपूर्वी त्याचे मृत महिलेशी विवाहबाह्य संबंध निर्माण झाले होते.

महिलेचा पती एका प्रकरणात सात वर्षे कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याचदरम्यान, 2017 मध्ये आरोपी आणि महिलेचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. आरोपी पत्नी, मुली आणि नोकरी सोडून महिलेबरोबर राहत होता. दोघेही आधी दोन वर्ष आंबेगावमध्ये आणि नंतर चार वर्ष अहिल्यानगरमध्ये राहिले.

गेल्या वर्षी महिलेचा पती कारागृहातून बाहेर आला. त्यामुळे महिला पतीबरोबर राहण्यासाठी पुण्याच्या शिक्रापूर येथे गेली. मात्र, ती आरोपीला वारंवार फोन करून पैशांची मागणी करत होती आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती.

तुझ्यासाठी गिफ्ट आणले….

अखेर, आरोपीने महिलेला भेटण्यासाठी बोलावले. सायंकाळी वांबोरी शिवारात, पंचमुखी महादेव मंदिराच्या जवळील डोंगरात तिला नेले. सुरुवातीला दोघांमध्ये गप्पा झाल्या. आरोपीने तिला “तुझ्यासाठी गिफ्ट आणले आहे, डोळे बंद कर” असे सांगितले. महिलेने डोळे बंद केल्यावर त्याने कोयत्याने तिच्या गळ्यावर वार केला.

त्यानंतर, त्याने मोठा दगड छातीवर टाकला आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. शेवटी, कोयत्याने महिलेचे शिर धडापासून वेगळे करून निर्घृण खून केला.

खून केल्यानंतर आरोपीचा…

या घटनेनंतर, आरोपी स्वतःहून राहुरी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि संपूर्ण हत्येचा तपशील उघड केला. पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवला. सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तपास करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe