अहमदनगर ब्रेकिंग : अत्याचार करून दिली जीवे मारण्याची धमकी ! नराधम सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Published on -

Ahmadnagar Breaking : वेळोवेळी अत्याचार करून २१ वर्षीय सुनेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तालुक्यातील एका नराधाम सासऱ्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेवासा तालुक्यातील एका गावातील पीडित सुनेने नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, माझा विवाह दि. १८ जुलै २०२१ मध्ये नेवासा तालुक्यातील एका तरुणाशी झाला.

सासरी घरामध्ये पती, सासू, सासरा व दिर आहेत. लग्न झाल्यानंतर मी माझ्या सासरी नांदत असताना पती कामाकरीता बाहेरगावी जायचे. सासू व दिर मजूरीच्या कामानिमित्त बाहेरगावी जायचे.

सासरा एकटाच घरी असायचा. माझ्यावर वाईट नजर ठेवून जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. विरोध केला असता तो मला शिवीगाळ, दमदाटी करुन घरात राहू देणार नाही, अशी धमकी देत असे. माझे नांदणे अवघड होईल, या कारणामुळे मी घडला प्रकार कोणाला सांगितला नाही.

फेब्रुवारी २०२३ मध्ये दुपारच्या वेळी मी घरी एकटीच असताना सासऱ्याने माझा हात धरुन माझ्यावर अत्याचार केला. त्यावेळी मी त्यास विरोध केला असता, त्याने तुझी बदनामी करुन तुला जिवे ठार मारून टाकीन, अशी धमकी दिली.

ते माझे काही बरे वाईट करतील, या भीतीने तसेच मी घडला प्रकार माझ्या पतीला सांगितला, तर माझे पती मलाच वाईट नजरेने बघतील, त्यामुळे मी त्यांना सांगितले नाही. त्यानंतरही सासऱ्याने माझ्यावर वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केला.

दि. २५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी मी घरी एकटीच असताना सासऱ्याने पुन्हा अत्याचार केला. यावेळी मी विरोध केला असता त्याने मला शिवीगाळ, दमदाटी करुन घराबाहेर काढून दिले. त्यानंतर मी माझ्या आई- वडिलांना घरातून काढून दिल्याची माहिती दिली.

त्यानंतर मी माहेरी गेले. आई वडिलांनी पुन्हा मला सासरी पाठवले; परंतु सासरी पुन्हा अत्याचार होईल या भीतीने हा प्रकार वडिलांना सांगितला.

त्यांनी धीर दिल्यानंतर वडिलांसह तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन येथे आले. या फिर्यादीवरून सासऱ्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe