त्रिमूर्तीचे संस्थापक संस्थापक अध्यक्ष साहेबराव घाडगे पाटील यांचे निधन

Published on -

Sahebrao Ghadge Patil passes away : नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव घाडगे पाटील (वय ७०) यांचे मंगळवार, दि. १० जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या दुःखद वार्तेने नेवासा आणि शेवगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियाद्वारे समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

साहेबराव घाडगे पाटील यांनी आपल्या अतुलनीय कार्याने शिक्षणाची गंगा गोरगरीब आणि ग्रामीण भागापर्यंत पोहोचवली. नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव या छोट्याशा खेड्यात अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. गावापासून १० किलोमीटर अंतरावरील ढोरजळगाव येथे पायी चालत जाऊन त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

नंतर ‘कमवा व शिका’ योजनेतून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यांच्या उच्च प्रतिभेच्या जोरावर त्यांनी राज्य परिवहन महामंडळ, पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय लोणी, भारतीय सैन्यदल आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्तपदासह विविध प्रशासकीय पदांवर कार्य केले.

उच्च पदांवर काम करत असताना ग्रामीण भागातील शेतकरी आणि कष्टकरी समाजातील मुला-मुलींसाठी शिक्षणाची सोय व्हावी, ही तळमळ त्यांच्या मनात होती. या ध्यासातून त्यांनी २४ नोव्हेंबर १९९५ रोजी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानची स्थापना केली.

या संस्थेच्या माध्यमातून आज पहिली ते बारावीपर्यंत सैनिकी शाळेत मुले-मुली शिक्षण घेत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात संस्थेची ६ संकुले असून, विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील धामनगाव रेल्वे येथेही के.जी. ते बारावीपर्यंत शाळा आणि डी.एड. कॉलेज सुरू केले आहे. ग्रामीण भागात त्यांनी २७ शाळा आणि २१ महाविद्यालयांसह वसतिगृहयुक्त शैक्षणिक दालने उभी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe