Ahmadnagar Braking : शिर्डीहून तुळजापूर येथे देवदर्शनासाठी चाललेल्या कारचालकाचा नगर- जामखेड रोडवरील पोखरी गावाजवळ ताबा सुटल्याने कार झाडावर आदळून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात (दि.२८) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. अनिता राहुल इंगोले (वय ३३), रा. शिर्डी व चालक रुपेश बबन भेंडे रा. शिर्डी, अशी मयतांची नावे आहेत.
अपघाताबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कारमध्ये प्रवास करणारे हे शिर्डी येथील असल्याची माहिती मिळाली असून, हे सर्वजण शिर्डीवरुन तुळजापूरला देवदर्शनासाठी चालले होते.
मात्र, त्यांची कार नगर- जामखेड रोडवरील जामखेडपासून काही आंतरवर आसलेल्या आष्टी तालुक्यातील पोखरी गावाजवळ आली असता, चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने (क्र. एम.एच.०३ बीसी ६७३६) या क्रमांकाची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या जांभळीच्या झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला.
अपघातात अनिता राहुल इंगोले (वय ३३) व चालक रुपेश बबन भेंडे रा. शिर्डी यांचा जागीच मृत्यू झाला तर अनुप राहुल इंगोले (वय १४) व अभय राहुल इंगोले (वय १२), हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
परिसरातील नागरिकांनी जखमींना तातडीने खासगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यासाठी मदत केली. आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोहे. काळे, पोलिस बब्रुवान वाणी, चालक कन्हेरे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.
नगर- जामखेड रोडवरील पोखरी फाट्याजवळ आष्टा फटा, या ठिकाणी मागील महिन्यात दि. २६ ऑक्टोबर रोजी एका खासगी ट्रॅव्हल्स बस पलटी होऊन भीषण अपघात झाला होता.
यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एका महिन्यात याच ठिकाणी थोड्या थोड्या अंतरावर असलेल्या रोडवर पुन्हा भीषण आपघात होऊन दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.