Ahmednagar Breaking : टाकळीभान गावठाण हद्दीतील संस्था, शाळा व शासकीय कार्यालयांच्या जागेकडे गाळा माफियांनी मोर्चा वळवून तेथे थेट अनधिकृत गाळे बांधायला सुरवात केली.
त्यात ग्रामपंचायत सदस्यच पुढे असल्याने अतिक्रमणावरून उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यामध्ये मंगळवारी सकाळी हाणामारी झाली. यात दोघे जखमी झाले. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
येथील कृषी विभागाच्या कृषी मंडळ कार्यालयासाठी जुन्या ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी तीस चर्षांपूर्वी शासकीय गट नंबर २५० मधील जागा ग्रामपंचायतीच्या ठरावाने देण्यात आलेली आहे.
या जागेवर कषी विभागाने सुमारे ८ लाख रुपये खर्च करून पक्की इमारत बांधून बाजुने तारेचे कुंपण केलेले आहे. सध्या या इमारत परिसरातील तारेचे कुंपण गायब झाले आहे.
कृषी मंडळ अधिकारी कार्यालय मात्र उभे आहे. याच मोकळ्या जागेवर मंगळवारी माफियांनी गाळे बांधायला सुरवात केली. याची माहिती उपसरपंच कान्हा खंडागळे यांना मिळाल्याने त्यांनी धाव घेत बांधकामास मज्जाव केला.
कृषी खात्याची जागा असल्याने या जागेवर अनधिकृत गाळे होऊ देणार नाही, असा पवित्रा खंडागळे यांनी घेतला. ग्रामपंचायत सदस्य सुनील बोडखे व उपसरपंच खंडागळे यांच्यात बाचाबाची होऊन हाणामारी झाली. यात बोडखे, व लाला मैड हे दोघे जखमी झाले.