Ahmednagar breaking : श्रीरामपूर- संगमनेर रस्त्यावर खंडाळा गावानजिक उसाने भरलेला ट्रक उलटल्यामुळे रस्त्यालगत चाललेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाल्याची घटना काल शनिवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की उसाने भरलेला १० टायर ट्रक (एमएच १२ एचसी ९६६६) श्रीरामपूरकडून बाभळेश्वरकडे ६ वाजण्याच्या सुमारास जात होता.
खंडाळ्यातील गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कमानीजवळ ट्रक आल्यानंतर डाव्या बाजुला झुकून उलटला. त्याचवेळी रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या खंडाळा येथील रहिवासी उषाबाई बाळासाहेब विघावे या उसाखाली दाबल्या, तसेच मोटारसायकलवर जाणारे नर्सरी (बेलापूर) येथील दोघेजण जखमी झाले.
मोठ्या वर्दळीत अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. घटनेत उसाखाली दबलेल्या महिला व पुरुषांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले. गावातील अमोल साबदे व मरकडे यांनी जेसीबी आणून ऊस बाजूला करण्यासाठी सहकार्य केले.
यावेळी श्रीरामपूर – संगमनेर रस्त्यावरील वाहतूक लांब अंतरापर्यंत ठप्प झाली होती. यावेळी पोलीस यंत्रणेकडून वाहतूक काही काळ थांबून सुरळीत करण्यात आली.
नगर-मनमाड रस्त्याची दुरुस्ती तसेच कोल्हार येथील पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक बाभळेश्वरमार्गे श्रीरामपूर अशी वळवण्यात आली आहे. त्यामुळे रहदारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.