Ahmednagar Breaking : कुस्तीच्या सरावा दरम्यान पैलवानाचा मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : कुस्तीचा सराव सुरू असताना पैलवानाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना राजूर (ता. अकोले) येथे सोमवारी सकाळी ७.३० वा. घडली. पै. मच्छिद्र लक्ष्मण भोईर (वय २४, रा. देवठाणा, ता. हिंगोली), असे मयत पैलवानाचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खेडेगावात कुस्तीची सुविधा उपलब्ध नसल्याने आई-वडिलांनी त्याला राजूर येथील साई कुस्ती केंद्रात पाठविले होते. आपल्या मुलाला कुस्तीचे चांगले प्रशिक्षण मिळावे, यासाठी लॉकडाऊनच्या अगोदर त्याच्या आई-वडिलांनी गावाकडची जमीन सोडून राजूर येथे येऊन एक खोली भाड्याने घेतली आणि सुमारे दोन वर्ष ते त्याच्यासाठी येथे थांबले.

आपल्या मित्रांबरोबर रमल्यानंतर त्याचे आई-वडील आपल्या मूळ गावी निघून गेले आणि मच्छिद्र आपल्या सहकारी मित्रांबरोबर साई कुस्ती केंद्रात राहून कुस्तीचे धडे घेऊ लागला. उत्कृष्ट शरीरयष्टी, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मच्छिद्रने काही दिवसांत नावलौकिक मिळवला.

लॉकडाऊनच्या काळात त्याच्या खांद्याला इजा झाली आणि उपचारासाठी तो आपल्या गावी गेला. उपचार केल्यानंतर पुन्हा तो येथील साई केंद्रात हजर झाला. भल्याभल्यांना आपल्या कुस्तीच्या डाव-प्रतिडावाने चितपट करणाऱ्या मच्छिद्रला मात्र हृदयविकाराने गाठले आणि नियतीच्या डावात तो पराभूत झाला.

ती गदा शेवटची ठरली

रविवारी रात्री पारनेर तालुक्यातील साकुर, मांडवे येथे आयोजित कुस्ती आखाड्यासाठी मच्छिंद्र सहभागी झाला होता. या आखाड्यातील अंतिम कुस्ती ही पै. मच्छिंद्र याने प्रतिस्पर्ध्यावर मात करत पटकावली आणि १५ हजारांच्या रोख रकमेसह चांदीची गदाही आपल्या खांद्यावर घेतली होती.

सोमवारी सकाळी सराव करत असतानाच पै. मच्छिंद्र याच्या छातीत दुखू लागले. त्यांनी आपल्या सहकारी मित्रांना सांगताच त्यांनी त्याला तात्काळ अकोले येथे हलवले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. अर्ध्या तासापूर्वी आपल्याबरोबर सराव करणारा आपला एक सहकारी अचानक आपल्यातून निघून गेल्याने हत्यांच्या डोळ्यांमधून अश्रू वाहत होते.

आवडत्या शिष्याला मुकलो

लॉकडाऊन पूर्वी मच्छिंद्र साई कुस्ती केंद्रात प्रशिक्षणासाठी आला होता. आपल्या तीन शस्त्रक्रियांवर मात करत तो पुन्हा उभा राहिला होता. काही महिन्यांत तो एक चांगला कुस्तीगीर बनला होता. तालमीतील मुलांनाही तो कुस्तीचे धडे देत होता.

अनेक ठिकाणी झालेल्या कुस्त्यांमध्ये मच्छिंद्र याने पहिला क्रमांक पटकावला होता. ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्याने रौप्य पदक मिळवले होते. २१ तारखेला तो आपल्या हिंगोली तालुक्यात तर २२ तारखेला तो जालन्यातील कुस्ती स्पर्धासाठी जाणार होता.

मात्र अचानक त्याचे हृदयविकाराने निधन झाले आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका आवडत्या शिष्याला मुकलो. – तानाजी नरके, प्रशिक्षक – साई कुस्ती केंद्र, राजूर.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe