कोरोना संकट वाढले ! व्हेरियंट येत्या काळात वेगाने वाढण्याची शक्यता

Ahmednagarlive24 office
Published:
Corona virus

Corona virus : कोरोनाचा विषाणू जागतिक स्तरावर सर्व देशांमध्ये सातत्याने बदलत, विकसित आणि प्रसारित होत आहे.भारतासह विविध देशांमध्ये कोरोनाच्या नवीन जेएन.१ सब व्हेरियंटचे रुग्ण वाढत असल्याच्या

पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दक्षिण-पूर्व आशियातील देशांना सतर्कता वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या आलेखावर लक्ष ठेवत उपाययोजना करण्यासाठी देखरेख यंत्रणा मजबूत करण्याचा सल्ला डब्ल्यूएचओने देशांना दिला आहे. तसेच लोकांना आवश्यक खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सद्यःस्थितीतील पुराव्यानुसार कोरोनाच्या जेएन.१ सब व्हेरियंटमुळे रुग्णंसख्या वाढत आहे. सध्याला तरी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोर यामुळे मोठी जोखीम नाही. पण या विषाणूच्या विकास कसा होत आहे याचा मागोवा घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे देशांनी पाळत यंत्रणा मजबूत करण्याबरोबर जनुकीय क्रमनिर्धारणावर भर देण्याची गरज दक्षिण-पूर्व आशियासाठीच्या डब्ल्यूएचओ प्रादेशिक संचालिका डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी व्यक्त केली.

डब्ल्यूएचओने जेएन.१ ला वेगाने प्रसारित होणाऱ्या व्हेरियंटच्या श्रेणीत टाकले आहे. गत काही आठवड्यांमध्ये हा व्हेरियंट विविध देशांमध्ये आढळला असून त्याची व्याप्ती वाढत चालली आहे. तसेच हा व्हेरियंट किती घातक आहे याचे मर्यादित पुरावे सद्यःस्थितीत उपलब्ध आहेत, असे सिंग म्हणाल्या. मात्र, हा व्हेरियंट येत्या काळात वेगाने वाढण्याची शक्यता आहे.

खासकरून हिवाळ्याची सुरुवात होणाऱ्या देशांमध्ये त्याची तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे लोकांना संरक्षणात्मक उपाय करण्याचे आणि आजारी पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याच्या सूचना डब्ल्यूएचओने केल्या आहेत.

त्याचबरोबर कोरोना आणि इन्फ्लूएंझाविरोधातील लसीकरणावर भर देण्याची गरज सिंग यांनी व्यक्त केली. डब्ल्यूएचओकडून परवानगी मिळालेल्या कोरोनाविरोधातील सर्व लसी जेएन.१ व्हेरियंटसह सर्व प्रकाराविरोधात प्रभावी असल्याचे त्या म्हणाल्या.

उल्लेखनीय बाब म्हणजे मे महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या व मृतांचा आकडा कमी झाल्याने डब्ल्यूएचओने कोरोना महामारी आता आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय नसल्याचे घोषित केले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe