Corona virus : कोरोनाच्या नव्या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सतर्क होत तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत कोरोना नियंत्रण, त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याकरिता टास्क फोर्स स्थापना करण्यात आले आहेत.
दिल्लीच्या आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली हे टास्क फोर्स काम करतील, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.
राज्यात जेएन-१ या नव्या विषाणूचा प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. दिवसागणिक याचे रुग्ण वाढत असल्याने सरकार अलर्ट मोडवर आले आहे. कोविड-१९ च्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्णसंख्येवर नियंत्रण, त्यावर उपाययोजना करण्यासाठी १३ एप्रिल २०२० रोजीच्या निर्णयान्वये टास्क फोर्स स्थापन केले होते.
त्याच धर्तीवर टास्क फोर्सची पुनर्रचना करण्यात आली आहे. दिल्ली आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली हे फोर्स काम करतील. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या कुलगुरू लेफ्ट.
जनरल डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक आणि बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथील डॉ. सुरेश कार्यकर्ते, नवले मेडिकल कॉलेज पुणे येथील डॉ. वर्षा पोतदार आणि याच
कॉलेजचे डॉ. डी. बी. कदम (फिजिशियन) हे या टास्क फोर्सचे सदस्य असणार आहेत. तर आयुक्त, आरोग्य सेवा सदस्य सचिव असतील. यासंदर्भातील शासन निर्णय आरोग्य विभागाने जारी केला आहे.
टास्क फोर्स असे करणार काम
गंभीर आणि अतिगंभीर आजारी कोविड-१९ रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉल स्थापन करणे, कोविड-१९ क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणे,
गंभीरपणे आजारी कोविड-१९ रुग्णांवर उपचार करताना एकसमानता राखण्यासाठी योग्य औषध प्रोटोकॉलची शिफारस करणे आदी कार्यवाही हा टास्क फोर्स करणार आहे.