शासकीय योजनांचे ५८ लाख सरकारी खात्यात जमा न करता स्वतःच्याच खात्यात केले जमा : जिपमध्ये ‘त्या’ दोघांचा ‘महाघोटाळा’

Sushant Kulkarni
Published:

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar news : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांच्या देयकातून कपात केलेल्या आयकर, जीएसटी, विमा, कामगार कल्याण निधी, सुरक्षा अनामत, दंड या रकमांमधून ५८ लाख २० हजार ५८६ रुपयांचा संगनमताने अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

या प्रकरणी बांधकाम उत्तर विभाग कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक अशोक अंबादास पंडित (वय ४२, रा.कर्जत) आणि रोहित शशिकांत रणशूर (वय ३८, रा.बोल्हेगाव, अहिल्यानगर) यांच्या वर मंगळवारी (१८ फेब्रुवारी) कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर विभागातील सहाय्यक लेखाधिकारी रावसाहेब शंकर फुगारे (वय ५४, रा. जुने बस स्थानकाजवळ, राहुरी) यांनी फिर्याद दिली आहे.सध्या आरोग्य विभागात वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदावर कार्यरत अशोक पंडित याने कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदावर बांधकाम उत्तर विभागात कार्यरत असताना १७ ऑगस्ट २०२३ ते २३ जानेवारी २०२४ या दरम्यान बांधकाम विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांच्या देयकातून कपात केलेल्या आयकर, जीएसटी, विमा, कामगार कल्याण निधी, सुरक्षा अनामत, दंड या रकमांमधून १३ लाख ९२ हजार ४७५ रुपये त्यांच्या स्वताच्या पॅन क्रमांकावर भरून शासनाची फसवणूक केली.

त्यानंतर त्यांची बदली पदोन्नतीने आरोग्य विभागात झाल्यावर ५० दिवस रोहित रणशूर याच्या कडे चार्ज न देता बेकायदेशीरपणे त्याच्या कडेच ठेवला.
याबाबत त्यास कारणे दाखवा नोटीस बजावल्यावर त्याने २३ जानेवारी २०२४ रोजी रणशूर कडे पदभार दिला.

त्यानंतरही रणशूर याला मदत करण्याच्या निमित्ताने या कपात केलेल्या रकमांचे डी.डी. काढून सुमारे ४४ लाख २८ हजार १११ रुपये स्वताच्या वैयक्तिक खात्यावर भरले,असे करत आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करत ५८ लाख २० हजार ५८६ रुपयांचा संगनमताने अपहार केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या ६ जणांच्या चौकशी समितीच्या चौकशीत समोर आले.

त्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अशोक पंडित व त्यास मदत करणारा रोहित रणशूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहाय्यक लेखाधिकारी रावसाहेब फुगारे यांना दिले होते.त्यानुसार त्यांनी मंगळवारी (१८ फेब्रुवारी) कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी दोघांच्या विरुद्ध शासकीय निधीचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला स.पो.नि. योगिता कोकाटे या करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe