२४ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : शासकीय कामानिमित्त अकोले पंचायत समिती कार्यालयात आलेल्या एका दिव्यांग नागरिकाला अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक देत शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकरणी गटविकास अधिकारी विकास चौरे, कक्ष अधिकारी कैलास येलमामे आणि एक महिला ग्रामसेवक यांच्यासह काही कर्मचाऱ्यांविरोधात अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की पीडित व्यक्ती दोन्ही पायांनी अपंग असून, खडकी खुर्द येथे झेरॉक्सचे दुकान चालवत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.पंचायत समिती कार्यालयात शासकीय कामासाठी ते आले असता, कक्ष अधिकारी कैलास येलमामे यांनी महिला ग्रामसेवकाला कागदपत्रांसाठी बोलावले.
यावेळी काशीद यांनी पीडित व्यक्तीला धमकावत शिवीगाळ केली आणि काही महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला.अधिकारी येलमामे यांनीही मोबाईल रेकॉर्डिंग बंद करण्यास धमकावले.गटविकास अधिकारी विकास चौरे यांनी ‘तुला जे करायचे ते कर, मी घाबरत नाही’ असे बोलून धमकावले.
या घटनेनंतर पीडित व्यक्तीने अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, महिला ग्रामसेवक, कक्ष अधिकारी कैलास येलमामे, गटविकास अधिकारी विकास चौरे आणि अन्य कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल एम. एस. आहेर करत आहेत.