Ahmednagar Crime : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यास जमावाने बेदम चोप देवुन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले असून तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलापूर महाविद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस सदर मुले हे सतत त्रास देत होते. दोन दिवसांपूर्वी आरोपीने पिडीत मुलीस बेलापूरच्या बाजारपेठेत कट मारला,
ही बाब कॉलेजच्या प्राध्यापकांना सांगितली. परंतु त्यांनी ही बाब गांभिर्याने घेतली नाही. परिणामी, आरोपींची हिम्मत वाढली. त्यांनी त्या मुलीला वर्गात एकटे पाहुन तिचा हात धरला व तु मला आवडतेस, असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्यामुळे मुलीने हा प्रकार घरी जावुन पालकांना सांगितला.
काही वेळातच ही चर्चा गावभर पसरली. मुलीचे पालक व हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपी मुलांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर जमाव पोलीस स्टेशनला आला. तेथे पतित पावन संघटनेचे सुनिल मुथा, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, जि.प. सदस्य शरद नवले,
देविदास देसाई, उपसरपंच अभिषेक खंडागळे, रविंद्र खटोड, पप्पु कुलथे, डॉ. प्रशांत खैरनार, किशोर फुणगे, मुस्ताक शेख, संजय छल्लारे, अजय डाकले, गणेश मंडलीक, प्रसाद खरात, रत्नेश गुलदगड आदीसह अनेक हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होईपर्यंत तळ ठोकुन होते.
अखेर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी हे स्वतः बेलापूर पोलीस स्टेशन येथे आले व याप्रकरणात वैयक्तिक लक्ष घालुन छेडछाडीच्या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, असे अश्वासन दिले.
यावेळी पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत कारवाई केली असून पोलिसांनी सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सुनिल मुथा यांनी दिला. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक जीवन बोरसे हे करीत आहे.