Ahmednagar Crime : झाडपाल्याचे औषध देण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग ! आरोपीला मुंबईतून अटक

Published on -

Ahmednagar Crime : एक महिन्यापासून विनयभंग प्रकरणातील फरार असलेला आरोपी पकडण्यात अखेर राजूर पोलिसांना यश आले आहे. त्याला मोठ्या शिताफीने मुंबईतून अटक करण्यात आली.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात शिंगणवाडीच्या शिवारात एक महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला होता. विनयभंगप्रकरणी मुरशेत येथील एका आरोपीवर दि. ६ ऑक्टोबर २०२३ रोजी राजुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी तेव्हापासुन पोलिसांना चकवा देत फरार झाला होता. आरोपीला अटक करण्यासाठी आदिवासी ठाकर समाजाने मोठे जनआंदोलन केले होते. त्यानंतर राजुर पोलिसांकडुन अधिक जलद गतीने तपास सुरु झाला होता.

आरोपी मुंबईतील विक्रोळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दडुन बसल्याची खात्रीलायक माहिती राजुर पोलिसांना सूत्रांकडून समजल्यानंतर राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रविण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दिलीप डगळे व अशोक गाडे यांनी विक्रोळी पोलिसांच्या मदतीने

सोमवार दि. ६ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यास ताब्यात घेतले, त्यास अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक शेख, हेड कॉन्स्टेबल दिलीप डगळे, अशोक काळे, अशोक गाडे करत आहेत.

या आरोपीने झाडपाल्याचे औषध देण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलेला असल्याने या प्रकाराचे आणखी साथिदार असण्याची दाट शक्यता आदिवासी ठाकर समाजाकडुन व्यक्त केली जात आहे.

यासंदर्भात त्यांनादेखील चौकशीसाठी ताब्यात घेणे गरजेचे आहे. जेणेकरुन पुन्हा आदिवासी भागात झाडपाल्याच्या नावाखाली किंवा भोंदुगिरीच्या नावाखाली असे अनुचित प्रकार घडणार नाही, अशी मागणी ठाकर समाजाचे नेते देविदास खडके व समाजबांधवांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe