Ahmednagar News : यापूर्वी थेट प्रांताधिकारी यांना वाळूतस्कर पोलिसानेच धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती. मात्र आता तर चक्क तहसीलदार आणि त्यांच्या भरारी पथकावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाने वाहन पळवून नेण्याच्या उद्देशाने अंगावर वाहन घालीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
यावेळी प्रसंगावधान राखीत वाहन बाजूला केल्याने पथकातील कर्मचारी बचावले अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा तब्बल २२ किमी पाठलाग करून पथकाने त्यास ताब्यात घेतले.
ही घटना तालुक्यातील कापरेवाडी शिवारात घडली.शुक्रवारी तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी कापरेवाडी शिवारात अवैध आणि विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करून सदरचा डंपर तहसील कार्यालयास घेण्यास सांगितले.
डंपर कर्जतच्या दिशेने घेत असताना चालकाच्या भ्रमणध्वनीवर वाहनमालक कदम याचा फोन आला असता त्याने चालकास डंपर कर्जतला घेवून जाण्यास मज्जाव केला. चालकाने तात्काळ डंपर भरारी पथक असलेल्या वाहनाच्या विरुद्ध दिशेने घेत तहसीलदार असलेल्या वाहनाच्या अंगावर घालत कापरेवाडीहुन शिंदेवाडीमार्गे टाकळी खंडेश्वरीकडे वळवला.
यावेळी शिंदेवाडी लगत असलेल्या सोलर प्लांटच्या जवळ रस्त्यावरच वाळूने भरलेला डंपर खाली करीत भरधाव टाकळीकडे गेला. यावेळी रस्त्याची लांबी मोठी असल्याने तहसीलदार आगळे यांनी आपली चारचाकी गाडीने तब्बल २२ किमी डंपरचा पाठलाग करीत वाहनचालक आणि क्लिनर यास ताब्यात घेतले.