Ahmednagar News : सात वर्षांच्या बालिकेवर वृद्धाकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना कोपरगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी ५० वर्षे वयाच्या वृद्धाला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय निवृत्ती बर्डे असे आरोपीचे नाव असून पीडित मुलीच्या आईने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी (दि. २४) मुलीचे आई, वडील सकाळी १० वाजता मोलमजूरीच्या कामासाठी जात असताना त्यांनी मुलीला नातेवाईकांच्या घरी ठेवले होते.

त्यानंतर ते दोघेही मजूरीच्या कामाला निघून गेले. दुपारी १२.३० ते १ वाजेच्या सुमारास मुलीस आरोपीने १० रुपये घे, असे म्हणून त्याच्या घरात बोलावून घेतले व घराचा दरवाजा आतून लावून अत्याचार केला.
आरोपी अत्याचार करत असताना मुलीच्या मामीने मुलीला आवाज दिला, तेव्हा नराधमाने त्या मुलीला ओरडू नको, असा दम दिला. ही घटना मुलीने आपल्या आईला सांगितली. त्यानंतर अधिक चौकशी केली असता अत्याचाराचा प्रकार पुढे आला.
याप्रकरणी बुधवारी (दि. २७) पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर कोपरगाव तालुका पोलिसांनी अत्याचार व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी तातडीने रात्री उशिरा अटक केली.
न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुलगी जिल्हा शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने यांच्या सूचनेनुसार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज महाजन अधिक तपास करीत आहेत.