१४ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी शिवार येथील कराळे वस्तीवर लताबाई नानाभाऊ कराळे (वय ५०, रा. पिंपळगाव माळवी) असे नाव असलेल्या एका महिलेचा खून झाल्याची घटना समोर आली आहे.हा खून का करण्यात आला असेल याचे कारण अजून समजलेले नसून या महिलेचा मृत्यू एखाद्या वस्तूने डोक्याला मार लागल्यामुळे किंवा डोके जमिनीवर आपटल्यामुळे झाला असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली.
लताबाई गुरूवारी दुपारी १२ ते सायंकाळी पाचच्या दरम्यान घरी एकट्याच होत्या.जेव्हा त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य घरी आले तेव्हा घडलेला हा प्रकार त्याच्या निदर्शनास आला.नानाभाऊ कराळे यांचे कुटुंब पिंपळगाव माळवी शिवारातील वस्तीवर वास्तव्य करते.नानाभाऊ कराळे व त्यांचा मुलगा कामानिमित्त गुरूवारी दुपारी बाहेर गेलेले असल्यामुळे लताबाई कराळे या दुपारी घरी एकट्याच होत्या.

संध्याकाळी पाचच्या सुमारास नानाभाऊ व त्यांचा मुलगा घरी आल्यानंतर त्यांना लताबाई या रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेल्या दिसल्या.त्यांच्या डोक्याला जबर मार लागलेला दिसत होता.नानाभाऊ कराळे आणि त्यांच्या मुलाने घटनास्थळी आरडोआरडा केल्यामुळे वस्तीवरील भरपूर लोक जमा झाले.
गावातील पोलिस पाटलांना सदर घटनेची माहिती देण्यात आल्यावर त्यांनी एमआयडीसी पोलिसांना खबर दिल्यावर माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला, उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपतराव भोसले, सहायक निरीक्षक चौधरी यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली.वरिष्ठ अधिकारी रात्री उशिरा पर्यंत घटनास्थळी उपस्थित होते.