अहिल्यानगर – पुणे महामार्गावर अपघात ! पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर

Published on -

अहिल्यानगरमधील अपघातांची मालिका अद्यापही सुरूच आहे. आता आणखी एक अपघाताचे वृत्त आले आहे. नगर पुणे महामार्गावर चास (ता. नगर) गावच्या शिवारात असलेल्या हॉटेल गुरुदत्त समोर पुण्याहून नगरच्या दिशेने येत असलेल्या पती पत्नीच्या दुचाकी वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर नगर मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या अपघातात निकिता ऋषिकेश डोरले (वय २२, रा. मुंगुसवाडे, ता. पाथर्डी) या तरुण विवाहितेचा मृत्यू झाला असून त्यांचे पती ऋषिकेश डोरले हे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.

नगर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार डोरले दाम्पत्य हे त्यांच्या होंडा युनिकोर्न कंपनीच्या मोटारसायकल वर (क्र. एमएच १४ एलएफ ०७०६) पुण्याहून नगर मार्गे पाथर्डी कडे त्यांच्या गावी जात होते. ते ४ एप्रिल रोजी रात्री ८.३० च्या सुमारास नगर पुणे महामार्गावर चास (ता. नगर) गावच्या शिवारात असलेल्या हॉटेल
गुरुदत्त समोर आले असता तेथील वळणावर त्यांच्या मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात ते दोघेही रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर तेथे वाहनचालकांची व परिसरातील हॉटेल व्यावसायिकांची गर्दी झाली. त्यातील काहींनी नगर तालुका पोलिसांना तसेच रुग्णवाहिकेला फोन करून माहिती दिली. ही माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे, पोलिस अंमलदार खंडेराव शिंदे, सोमनाथ वढणे, चालक स. फौ. दिनकर घोरपडे आदींनी घटनास्थळी धाव घेत दोघा जखमींना उपचारासाठी नगरला रुग्णालयात हलविले.

यातील निकिता डोरले यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर ऋषिकेश डोरले यांच्यावर उपचार सुरु आहेत. सदर अपघात मोटारसायकल रस्ता दुभाजकाला धडकून झाला की, त्यांच्या मोटारसायकलला एखाद्या अज्ञात वाहनाने धडक दिली याचा शोध पोलिस घेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News