३ जानेवारी २०२५ संगमनेर : तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर झालेल्या मारहाण प्रकरणातील पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने काल गुरुवारी (दि. २) नाशिक जिल्ह्यातून या आरोपींना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व तरुण उद्योजक अतुल राधावल्लभ कासट व त्यांच्या दोन बंधूंना हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर मारहाण झाली होती. टोल नाका येथील कर्मचाऱ्यांची दादागिरी वाढल्याने मारहाण करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अतुल कासट यांनी या मारहाणीची फिर्याद दिली होती.पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.आरोपींना पकडण्यासाठी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास दुमणे यांनी तपास पथक तयार केले होते.
मारहाण प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना या पथकाला देण्यात आल्या होत्या.या पथकाने तपासा दरम्यान सिसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा आरोपी हे नाशिक येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने तपास पथकाने नाशिक येथे जावून आरोपींचा शोध घेतला.
पोलीस पथकाने नाशिक रोड परिसरातून प्रथमेश धनंजय जाधव, संदिप राजाराम जाधव, जयेश बंडु भोर, गणेश भिमराव लोणे (सर्व रा. पिंपळगाव खांब, जि. नाशिक) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सदर गुन्हा केल्याचे मान्य केल्याने त्यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास दुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपधिक्षक सातपुते, हेड कॉन्स्टेबल अशिष आरवडे, सचिन उगले, बाबासाहेब शिरसाठ यांनी आरोपींना अटक केली.