३१ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी चारचाकी वाहनांवर असलेल्या काळ्या काचा (ब्लॅक फिल्म) हटवण्याची विशेष मोहिम हाती घेतली आहे. २८ व २९ जानेवारीला सायंकाळी पोलिसांनी ठिकठिकाणी केलेल्या नाकाबंदी करुन काळ्या काचा असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या आदेशानुसार, मंगळवारी सायंकाळी पाच ते सात या वेळेत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, कायनेटिक चौक, प्रोफेसर चौक आणि भिंगार नाला याठिकाणी नाकाबंदी करून तपासणी मोहीम राबवण्यात आली. २८ जानेवारीला ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
२९ जानेवारीलाही सायंकाळी शहर पोलिसांनी नाकाबंदी करून कारवाई सुरू केली होती. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.या कारवाई दरम्यान काळ्या काचा वापरणाऱ्या वाहनचालकांवर तात्काळ कारवाई करत त्यांच्या वाहनांवरील ब्लॅक फिल्म हटविण्यात आल्या. कोतवाली पोलिसांनी ३६ वाहने, तोफखाना पोलिसांनी २७ वाहने, भिंगार कॅम्प पोलिसांनी १२ वाहने तर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी १५ वाहनांवर कारवाई केली.
पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, तोफखान्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे आणि भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदारांनी ही कारवाई केली.