अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगरच्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एकाच वेळी नेवासा, नेवासाफाटा, सलबतपूर व घोडेगाव येथील परवानाधारक देशी दारू दुकानांवर छापा टाकून बनावट दारू बाबत रविवारी रात्री एकाच वेळी वेगवेगळ्या पथकाने ही कारवाई केली.
यात काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी हे रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत सीलबंद बाटल्यांमधील काही दारू काढून त्यात पाणी भरून पुन्हा सील करत होते.
नेवासा फाटा येथील परवानाधारक रवींद्र कत्तेवार दारू दुकानात पथकाने छापा टाकला तेव्हा आरोपी प्रशांत सोडा, लिंगया प्रशांत गौड व नरसिमल्लू पूठ्ठा (सर्व रा.आंध्र प्रदेश,ह.मु.नेवासा फाटा) हे देशी दारूच्या सीलबद बाटल्यांमधून काही प्रमाणात दारू काढून ती दुसऱ्या बाटल्यांमध्ये भरत होते.
दारू काढलेल्या बाटल्यामध्ये पाणी भरून पुन्हा चिकट टेप लावून पहिल्यासारखेच सील करत होते. या दुकानातून पथकाने ३०० पत्री बनावट बुच, संत्रा, बॉबी या ब्रँडचे बनावट दारू तसेच चिकट टेप, भेसळयुक्त देशी दारूच्या ३ हजार ५५५ सीलबंद बाटल्या, काचेच्या 36 बाटल्या, पाण्याचे जार आदी मुद्देमाल जप्त केला आहे.
दुसऱ्या पथकाने सलाबतपूर येथील देशी दारूच्या दुकानात छापा टाकला तेव्हा तेथेही असाच प्रकार सुरू होता. दुकानाशेजारीच असलेल्या एका खोलीत प्रशांत राधेशाम गौड हा बाटल्यांमध्ये पाणी भरून भेसळयुक्त दारू तयार करत होते.
याठिकाणी पथकाने ३०० बुच व ३०० रिकाम्या बाटल्या,१ लोखंडी बादली तसेच ९ बाटल्यांमध्ये भेसळयुक्त मद्य आढळून आले. त्यानंतर घोडगाव येथील बी.एम.कलाल या देशी दारू दुकानामध्येही पथकाला असाच प्रकार आढळून आला. या ठिकाणी ४१२८ रिकाम्या बाटल्या,८६ बॉक्स , ७७५ बनावट बुचे, प्लास्टिक बकेट आदी मुद्देमाल आढळून आला.
नेवासा येथील दारू दुकानामध्येही छापा टाकून काही संशयितांना अटक केली. राज्य उत्पादन शुल्क चे आयुक्त कांतीलाल उमाप, विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक एन.बी.शेंडे,
बी.टी.घोरतळे, निरीक्षक राख, हुलगे, अनिल पाटील, अण्णासाहेब बनकर, संजय कोल्हे, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम