बस स्थानकावरील सुरक्षा हा विषय मागील काही दिवसांपासून ऐरणीवर आलेला विषय आहे. महिलांसाठी बसस्थानके किती सुरक्षित यावर अनेक वादविवादही झाले दरम्यान आता नगर स्टॅण्डसमोर एका कारमध्ये महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडलाय. शिक्रापूरहून नगरला येण्यासाठी खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कारमध्ये बसून आलेल्या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे.
या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनीगंठण कारचालकाने हिसकावून घेतले, तिचा गळा दाबून आरडाओरडा केला तर जीवे ठार मारील अशी धमकी दिली आणि तिला कार मधून खाली रस्त्यावर ढकलून देत भरधाव वेगात कार घेवून पसार झाला. ही घटना स्वस्तिक चौकातील पुणे बसस्थानकासमोर रस्त्यावर २३ मार्चला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.

फिर्यादी या २० मार्चला त्यांच्या नातेवाईकांकडे निमगाव माळवणी (ता. शिरूर, जि. पुणे) येथे गेल्या होत्या. तेथून २३ मार्चला सकाळी त्या नगरला येण्यासाठी निघाल्या, त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना शिक्रापूर येथून एका खाजगी प्रवासी कार मध्ये बसवून दिले. त्या कारचालकाच्या शेजारील सीट वर बसलेल्या होत्या तर त्यांची पैसे, कपडे व मोबाईल ठेवलेली बॅग कारच्या पाठीमागील डिक्कीत ठेवली होती.
शिक्रापूर ते नगर दरम्यान कारचालक रस्त्याने ठिकठिकाणी प्रवासी घेत होता. चास जवळ आल्यावर सर्व प्रवासी कार मधून उतरले. तेव्हा फिर्यादी व कारचालक असे दोघेच कार मध्ये राहिले होते. दुपारी १ च्या सुमारास कार नगर शहरात स्वस्तिक चौकातील पुणे बसस्थानकासमोर स्वस्तिक चौकातील पुणे बसस्थानकासमोर आली. त्यावेळी कारचालकाने कार थांबवून फिर्यादी यांच्या गळ्यातील मिनीगंठण हिसका मारून तोडले तसेच त्यांचा गळा दाबून आरडाओरडा केला तर जीवे ठार मारील अशी धमकी दिली.
या प्रकाराने फिर्यादी घाबरून गेल्या. त्यांना काही कळायच्या आत कारचालकाने त्यांच्या बाजूचा दरवाजा उघडून त्यांना रस्त्यावर ढकलले आणि भरधाव वेगात कार घेवून तेथून पसार झाला. या नंतर सदर महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून अनोळखी कार चालकाविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.