अहिल्यानगर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना पाहता नगरचा बिहार होतोय की काय असा प्रश्न पडू लागला आहे. सिगारेटचे पाकीट उधार दिले नाही या किरकोळ कारणातून पेट्रोल टाकून किराणा दुकान पेटवून दिल्याची घटना घडली आहे. ही घटना नगर तालुक्यामधील नांदगाव येथे घडली. या आगीत किराणा सामान व फर्निचर जळून सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती समजली आहे. विजय दादासाहेब जाधव (रा. नांदगाव ता. नगर) असे आरोपीएचे नाव आहे. दुकानदार शिवाजी भगवान सोनवणे (रा. नांदगाव ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे नांदगाव येथे शनेश्वर किराणा नावाचे दुकान आहे. त्या दुकानात विजय दादासाहेब जाधव (रा. नांदगाव ता. नगर) हा आला व त्याने सोनवणे यांना सिगारेटचे पाकीट उधार मागितले. परंतु सोनवणे यांनी त्यास सिगारेटचे पाकीट उधार दिले नाही. याचा राग आल्याने विजय जाधव यांनी सोनवणे यांच्या दुकानाचे शटर उचकाटून आत पेट्रोल टाकून दुकान पेटवून दिले. पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

तर दुसऱ्या एका घटनेमध्ये सुट्टे पैसे दिले नाही याचा राग आल्याने हातगाडी चालकावर कोयत्याने वार केले आहेत. ही घटना नगर एमआयडीसी येथील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनी समोर १६ मार्च रोजी घडली. याबाबत प्रथमेश डेविड पवार (रा. चक्रधर स्वामी मंदिर मागे, नागापूर, एमआयडीसी, अ.नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की प्रथमेश आणि त्याचे वडील डेव्हिड पवार हे त्यांच्या चिकन टिक्का या गाडीवर असताना त्याचे गाडीवर मनोज साळुंखे (रा. गणेश चौक, नागापूर) हा त्याच्या अन्य तीन साथीदारासह चिकन टिक्का खाण्यासाठी आला. चिकन टिक्का खाल्ल्यानंतर त्यांच्याकडे बिलाची मागणी केली असता त्यांनी पन्नास रुपयांच्या बिला करिता पाचशे रुपये हातगाडी चालकाला दिले. यावर हातगाडी चालक पवार त्यांना म्हणाले की सुट्टी पैसे आमच्याकडे नाहीत. असे म्हटल्याचा मनोज साळुंखे व इतरांना राग आल्याने त्यांनी त्यांना शिवीगाळ केली व सुट्ट्या पैशाकरिता लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मनोज साळुंखे यांनी त्याच्या हातातील कोयता डेव्हिड पवार यांच्या हातावर मारला. पवार हे जखमी झाले.