सोमठाणे नलवडे येथे अवैध दारु विक्री केल्याप्रकरणी गावचे उपसरपंच आकाश दौंडे यांचा योगेश दौंडे यांच्याशी वाद झाला. त्यानंतर आकाश दौंडे पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिस ठाण्याच्या आवारात दोन गटात मारामारी झाली. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मारामारी केल्याप्रकरणी ७ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दौंडे यांच्या दोन गटात झालेल्या मारामारीत पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर व सहकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सोमठाणे नलवडे येथे ग्रामसभेने दारुबंदीचा ठराव घेतलेला आहे. आकाश यांनी योगेश यांना दारु विकु नको असे सांगितले. त्याचा राग येवुन योगेश यांनी आकाश यांना मारहाण केली.
आकाश यांनी योगेश दौंडेविरुद्ध पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. आकाश हे सहकाऱ्यांसह पोलिस ठाण्यातून बाहेर जाताना योगेश दौंडे, सचिन दौंडे, संतोष दौंडे, मनोज तुपविहरे समोरुन आले. दोन्ही गटात मारामारी सुरु झाली. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. राजगुरु, उपनिरीक्षक सचिन लिमकर, कृष्णा बडे, अनिल बडे , सचिन नवगिरे, भगवान सानप, बडे, वारे आदि सर्वजण धावले व त्यांनी मारामारी सोडली.
पोलिस नाईक दत्तात्रय बडधे यांच्या फिर्यादीवरुन दोन्ही गटातील योगेश दौंडे, सचिन दौंडे, संतोष दौंडे, मनोज तुपविहरे व आकाश दौंडे आणि दोन अनोळखी अशा सात जणांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी मारामारी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले होते.