Ahmednagar Breaking : जावांच्या भांडणात पतीने दिली समज, नातेवाईकांनी पिस्तूल, दांडक्याने केला हल्ला..’तो’ लपला अन कारखान्याच्या संचालकालाच बेदम मारला

hanamari

Ahmednagar News :  दोघी जावांचे कडाक्याचे भांडण झाले. दोघींनाही चांगल्या भाषेत समज देणाऱ्या व्यक्तीवर नातेवाईकावर आज हल्ला झाला. शिरूर तालुक्यातील दोन गावांतील कौटुंबिक वादाचा थरार लोणी व्यंकनाथ शिवारात झाला. जमावाच्या हाती कोयते, लाकडी दांडके आणि पिस्तूलही होता.

त्यात विनाकारण एका पदाधिकाऱ्याला मारहाण झाली आणि तो नातेवाईक लपून बसल्याने सहिसलामत सुटला. याबाबतची माहिती अशी, तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे विवाहाच्या निमित्ताने शिरूर तालुक्यातील दोन व्यक्ती दुचाकीवर आले होते. त्यांचा दोन मोटारीत असणाऱ्या लोकांनी पाठलाग केला.

जीव मुठीत धरून हे दोन दुचाकीस्वार नगर-दौंड महामार्गालगत असणाऱ्या पवारवाडीत गेले. त्यातील ज्याचा खरा पाठलाग सुरू होता त्याने दुचाकीवरून पाठीमागून उडी मारली आणि एका घरात शिरताना दरवाजा आतून बंद केला.

त्याचवेळी पाठलाग करणाऱ्या मोटारी तेथे धडकल्या. दुचाकी चालविणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला पकडत बेदम चोप देण्यास सुरुवात केली. तो मार खाणारा व्यक्ती त्यांना सांगत होता की ”मी कारखान्याचा संचालक आहे, मला मारू नका” पण कुणीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.

त्या लोकांच्या हाती कोयते, दांडके होते. काय चालले हे त्या घरमालकाला समजण्यापूर्वीच एका जणाने कमरेचे पिस्तूल काढले आणि त्याने धाक दाखवित “दरवाजा उघडा अन्यथा मारून टाकतो” अशीच धमकी दिली. “नेमका काय प्रकार आहे, तुम्ही कोण आहात, तो घरात शिरलेला व्यक्ती कोण आहे” हे सगळे प्रश्न ते घरमालक व त्यांच्या घरातील महिला “त्या” लोकांना विचारत होत्या पण कुणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

त्याचवेळी गोंधळ झाल्याने आसपासच्या घरातील लोक जमू लागले. घरात लपलेल्या व्यक्तींनी विवाहाला आलेल्या वऱ्हाडी मंडळींना माहिती देत बोलावून घेतले. लोक जमत असल्याचे लक्षात येताच, हाती शस्त्रे असलेल्या लोकांनी तेथून काढता पाय घेतला.

नंतर माहिती घेतली असता, जो लपून बसलेला व्यक्ती होता त्याच्या घरी त्याच्या पत्नीचे व त्याच्या वहिनींचे भांडण झाले होते. त्यातून त्याने त्या दोघींनाही सुनावले होते. त्यातून नातेवाईक आले आणि त्यांनी हा भयानक प्रकार घडविला. लोक जमले अन्यथा काही तरी अनर्थ घडला असता असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पोलिसात घटनेची कुठलीही नोंद नव्हती. तथापि या प्रकाराने त्या परिसरात मोठी दहशत झाली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe