अहमदनगर ब्रेकींग: पाट पाण्याच्या वादातून दोघा सख्या भावाने केला युवकाचा खून; न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- पाट पाण्याच्या वादातून एका युवकाचा खून करणार्‍या दोघा सख्या भावाला जिल्हा न्यायालायाने जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.

चित्तरंजन रामचंद्र घुमरे (वय 31) व प्रियरंजन रामचंद्र घुमरे (वय 35 दोघे रा. भातकुडगाव) अशी शिक्षा झालेल्या आरोपी भावांची नावे आहेत.

त्यांनी ज्ञानेश्‍वर नागरगोजे (रा. भातकुडगाव) या युवकाचा खून केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी हा निकाल दिला. या खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकिल श्रीमती पुष्पा कापसे-गायके यांनी कामकाज पाहिले.

काय आहे घटना- ज्ञानेश्वर नागरगोजे हा युवक भातकुडगाव येथे आई वडिलांसोबत राहून शेती करत होता. त्यास शेतीकामी मदत करण्यासाठी त्याच्या मामाचा मुलगा वैभव हरीभाऊ सानप (रा. सौताडा ता. पाटोदा जि. बीड) हा भातकुडगाव येथे आला होता.

5 मार्च 2020 रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर व वैभव हे शेताला पाणी देण्याठी शेतात गेले होते. ज्ञानेश्वर यांच्या शेताशेजारी चित्तरंजन व प्रियरंजन घुमरे या दोघा भावांची शेती काही अंतरावर आहे. त्या शेती शेजारून शेती मालाला पाणी जाण्यासाठी छोट्या चार्‍या बनविलेल्या होत्या.

5 मार्च 2020 च्या रात्री ज्ञानेश्वरने चित्तरंजन व प्रियरंजन यांच्या शेतजवळील पाण्याचे चारीचे पत्राचे गेट उघडल्यानंतर ज्ञानेश्वर व वैभव रात्री 11 वाजेच्या सुमारास सामनगाव चौफुलीवर असलेल्या मुळा धरणाच्या पाटावर आले.

ज्ञानेश्वर हा पाटाच्या कडेला पाटावर खाली बसलेला असताना तेथे चित्तरंजन व प्रियरंजन दुचाकीवरून आले व तुम्ही आमचे शेताजवळील चारीचे पत्राचे गेट का काढले, असे म्हणून शिवीगाळ करून तोंडात मारले.

त्यानंतर चित्तरंजन याने ज्ञानेश्‍वरच्या छातीवर लाथ मारली. त्यावेळी ज्ञानेश्वर सुमारे 10 फुट उंचीवरून खाली डोक्यावर पडल्यामुळे मानेला व डोक्याला जबर मार लागला त्यात तो जागेवर बेशुध्द झाला.

त्यानंतर चित्तरंजन व प्रियरंजन पळून गेले. वैभवने इतरांच्या मदतीने ज्ञानेश्वरला पाटातून बाहेर काढले व उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर वैभवने शेवगाव पोलीस ठाण्यात चित्तरंजन व प्रियरंजन विरूध्द फिर्याद दिली.

ज्ञानेश्वरवर पुणे येथे उपचार सुरू असताना त्याचा 11 डिसेंबर 2020 रोजी मृत्यू झाला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe