Ahmednagar Breaking : नगर तालुक्यातील अरणगाव येथील मेहेरबाबांच्या समाधीच्या दर्शनाला गेलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढत तिच्या दोन भावांना, वडिलांना व चुलत्यास टोळक्याने लाथाबुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि.१७) सायंकाळी ४.४५ च्या सुमारास घडली.
याबाबत केडगाव उपनगरात राहणाऱ्या पिडीत अल्पवयीन मुलीने नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी ही तिच्या २ भावांसह अरणगाव येथील मेहेरबाबांच्या समाधीच्या दर्शनाला गेली होती. दर्शन घेवून ते टेकडीवर फिरत असताना अरणगाव मधील तरुणांचे एक टोळके तेथे आले व त्यांनी त्या मुलीची छेड काढण्यास सुरुवात केली.
तिच्याशी अश्लील भाषेत बोलत तिचा विनयभंग करण्यात आला. त्यावेळी तिचे दोन्ही भाऊ तिला सोडवायला गेले असता या टोळक्याने दोघांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण केली. ही माहिती मुलीच्या वडिलांना समजल्यावर ते व मुलीचे चुलते तेथे गेले असता या टोळक्याने त्यांनाही मारहाण केली.
मुलीचे चुलते मोबाईल मध्ये व्हिडीओ काढत असताना या टोळक्याने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत तो फोडून टाकला. या प्रकाराबाबत सदर मुलीने दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी वीर गौतम जाधव, सौरभ कांबळे, सतीश कांबळे,
वीर भैय्या कांबळे, पिल्या उर्फ मिहीर कांबळे, क्रिश पाटोळे यांच्यासह अनोळखी तरुणांविरुद्ध भा.दं.वि. कलम ३५४, ३२४, ३२३, ३४१, १४३, १४७, ४२७, ३४ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ७, ८ (पोक्सो) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत असून या घटनेने परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.