Ahmednagar News : वेडसर महिलेवर पाशवी अत्याचार, चोप देत नराधम पोलिसांच्या हवाली

Pragati
Published:
atyachar

 

Ahmednagar News : संगमनेर शहरात रोजगारासाठी उत्तरप्रदेशमधून आलेल्या परप्रांतीय इसमाने एका मनोरुग्ण महिलेवर पाशवी अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, नराधम आरोपीला नातेवाईकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

प्रकाश रामनरेश निसाद (मुळचा उत्तरप्रदेश, सध्या रा. पावबाकी रोड, संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणातील प्रकाश याने पोलिसांना खोटे नाव सांगत तक्रारदारासह पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र ‘पोलिसी’ खाक्या दाखविताच त्याने खरे नाव सांगितले. प्रकाश निसाद याने ४२ वर्षीय पिडित वेडसर महिलेवर अत्याचार केला.

ती आईसह शहरातील उपनगरात राहते. मानसिकदृष्ट्या आजारी व पतीपासून फारकत झालेल्या महिलेच्या वेडसरपणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औषधांच्या अंमलाखाली ती सर्वसाधारण अवस्थेत असते. तिच्या वेडसरपणाचा गैरफायदा आरोपी प्रकाश याने घेतला.

मंगळवारी सायंकाळी ६ः३० वाजेच्या दरम्यान घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने महिलेवर अत्याचार केला. दरम्यान, काही वेळाने हा प्रकार बाहेरून घरी परतलेल्या नातेवाईकांच्या लक्षात आला. त्यांनी बंद खोलीतील पिडितेला आवाज दिला. यावेळी ती मोठ मोठ्याने गाणे म्हणत होती.

यामुळे नातेवाईकांनी खिडकीतून आत डोकावले असता तिच्यासोबत एक अनोळखी इसम संशयास्पदरित्या आढळला. नातेवाईकांनी आरडा ओरड करुन त्याला पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.  नुकताच संगमनेरमधून महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार केल्याची घटना समोर आलेली होती.

संगमनेर शहरालगतच्या परिसरातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस सह्याद्री कॉलेजजवळ राहणाऱ्या विशाल संपत बोऱ्हाडे याने आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी बोऱ्हाडे याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.