Ahmednagar News : चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच दिवशी चार दुकाने फोडली अन मंदिरातील दानपेटी देखील पळवली

Pragati
Published:

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून,  चोरट्यांनी शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील बस स्टैंड चौकातील चार दुकाने तसेच काटेवाडी येथील हनुमान मंदिरातील दानपेटी फोडली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.२०) पहाटेच्या सुमारास घडला.

या घटनेत चोरांनी  कृषी सेवा केंद्रातून ४ लाख ७० हजार ६०० रुपयांची बियाणे, ग्राहक सेवा केंद्रातून १ लाख ३० हजार २५० रुपये रोख, १० हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे बीबीआर, दोन मेडिकल मधून १ हजार रुपये रोख व २ हजार रुपये किमतीचे कॉस्मेटिक वस्तू तसेच हनुमान मंदिराच्या दानपेटीतील अंदाजे ५ हजार रुपये, असे एकूण ६ लाख १८ हजार ८५० रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला आहे.

चोरट्यांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास आखेगाव येथील बस स्टैंड चौकातील छत्रपती ऑनलाइन सेवा तथा बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहक सेवा केंद्राचे कुलूप तोडले. त्यांनी शटरचे सेंट्रल लॉक उचकटून या केंद्रातील १ लाख ४० हजारांची रोकड, सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी वापरले जाणारे डीव्हीआर यंत्र, काही महत्त्वाची कागदपत्रे चोरी केली.

त्यानंतर चोरांनी मोर्चा ऑनलाइन सेवा केंद्राच्या समोरील कृषी सेवा केंद्राकडे वळविला. कुलूप तोडून दुकानातील कांदा, कपाशी, टरबूज बियाण्याची पाकिटे तसेच आठ ते दहा हजार रुपयांची रोकड लंपास केली.

कृषी सेवा केंद्राच्या शेजारील मेडिकलचे कुलूप तोडून दुकानातील हजारो रुपये किमतीच्या कॉस्मेटिक वस्तू लंपास केल्या. त्यानंतर रिद्धी सिद्धी मेडिकलचेही कुलूप तोडून वीस हजार रुपये किमतीचे कॉस्मेटिक तसेच चिल्लर लंपास केली.

त्यापाठोपाठ हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी उचलून नेली व शेजारी असलेल्या अंगणवाडी इमारत सुरक्षा भिंतीच्या आडोशाला जाऊन दानपेटी फोडली. पंधरा हजार रुपयांच्या आसपास रक्कम दानपेटीमध्ये असावी, अशी शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली.

दरवर्षी गावात होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी व श्रावण महिन्यात दानपेटी उघडली जाते. त्यावेळी पंधरा हजारांच्या आसपास रक्कम दानपेटीमध्ये निघत असल्याची माहिती यावेळी दिली. दरम्यान या घटनेनंतर पोलिस व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वानाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र श्वानाला काहीच मार्ग मिळाला नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe