Ahmednagar News : पोलीस सुतावरून स्वर्ग गाठू शकतात असे म्हटले जाते. पोलिसांनी जर ठरवलं तर ते कोणत्याही आरोपीस कुठल्याही पद्धतीने जेरबंद करू शकतात. याचे अनेक उदाहरणे देखील समोर आहेत.
दरम्यान आता अहमदनगरमधील एका खुनाचे कोडे पोलिसांनी 50 पैशांच्या पोस्ट कार्डचा वापर करून सोडवले आहे. निर्घृण खून करणारा खुनी पोलिसांनी अगदीच अनोखी शक्कल लावत पकडला आहे.

नेवासे तालुक्यातल्या पाचेगाव शिवारात लोखंडी फॉल, कारवाडी येथे बुधवार दिनांक 13 मार्च 2024 रोजी एक खुनाची घटना घडली होती. ओम साई या हॉटेलचे चालक बाळासाहेब सखाहरी तुवर यांच्या डोक्यात टणक वस्तूने मारुन निर्घृणपणे खून केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याकडे होता.
स्थानिक पोलीस स्टेशनचे पाच आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक अशी एकूण सहा पथकं तपास करीत होती. गुन्ह्याच्या संबंधाने सुमारे १२० जणांची तपासणी करण्यात आली. घटनास्थळापासून ३०० मीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावरील अस्पष्ट आणि अंधूक सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले असता घटनेच्या दिवशी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती आणि कुत्र्याची हालचाल पोलिसांच्या निदर्शनास आली. तपासामध्ये अशी 30 वर्षीय व्यक्ती की जिच्याशी मृतकचा वाद होते आणि त्या व्यक्तीकडे श्वान होता अशा व्यक्तीवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
आरोपीबाबत काही व्यक्तींना नक्की माहिती असणार परंतु चौषीसाठी व ते सांगण्यासाठी कुणी पुढे येत नाही हे तपास अधिकारी धनंजय जाधव यांनी जाणले. धनंजय जाधव यांनी पोस्टातून ५० पैशांचे १०० कार्ड खरेदी करून त्या कार्डावर स्वत:चे नाव व पत्ता लिहून करवाडी व पाचेगाव शिवारात सदर कार्डचे वाटप करून आरोपींना ओळखत असाल तरच या कार्डवर आरोपीचे नाव लिहा वे व सदर कार्ड कोणत्याही पोस्ट बॉक्समध्ये टाकावे, असे आवाहन केले होते.
या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देऊन कार्डद्वारे सदरचा खून पोपट सुदाम सूर्यवंशी या इसमानं वैयक्तिक भांडणातून केला असल्याबाबतची माहिती दिली होती. पोलिसांनी पोपट सुदाम सूर्यवंशी या इसमाला शिताफीनं ताब्यात घेत चौकशी केली.
सुरुवातीला त्यानं असं काही केलं असल्याबाबत नकार दिला. परंतू पॉलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला व खून केल्याची पोपट सुदाम सूर्यवंशी याने कबुली दिली अन खुनाचे रहस्य उलगडले.