Ahmednagar News : बायकोला व्हिडिओ कॉल केल्याने घात झाला..अहमदनगरमधील ‘त्या’ खुनाचा रहस्यमयी उलगडा, सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घातला, अन..

Pragati
Published:
murder

 

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नागापूर येथील एका खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. नागापूर येथे जो बेवारस मृतदेह सापडलेला होता त्याच्या मुळापर्यंत जाण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर मृत तरुण बायकोशी व्हिडिओ कॉलवरून बोलत होता.

परंतु तेथे असणाऱ्या आरोपींना तो आपले शूटिंग करतो आहे, असा संशय आला. त्यांनी सिमेंटचे ब्लॉक डोक्यात घालून तरुणाला ठार मारले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. किरण बाळासाहेब गव्हाणे (रा. शनिशिंगणापूर, ता. नेवासा), सोन्या ऊर्फ गौतम भगवान अंभोरे (रा. शनिशिंगणापूर, ता. नेवासा), संग्राम सोन्याबापू कदम (वय १९, रा. विठ्ठल रुक्मिणी मंदिराशेजारी, नागापूर एमआयडीसी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अधिक माहिती अशी : नागापूर येथील सह्याद्री चौकात एक मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आला होता. हा मृतदेह स्टिफीन अविनाश मिरपगार (वय ३३, रा. आंधळेचौरे, नागापूर, ता. नगर) या तरुणाचा असल्याचे समोर आले होते. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी तपासासाठी स्वतंत्र पथक तयार केले.

या पथकाने चौक व परिसरातील सीसीटीव्ही तपासले. यातून मयत तरुणाच्या खुनाचे गुपित उलगडले. मयत तरुण व त्याची पत्नी ४ जून रोजी व्हिडिओ कॉलवरून बोलत होते. त्यांचे बोलणे सुरू असताना तो आपले शूटिंग करत आहे, असा संशय आला. ‘तू आमचा व्हिडिओ का काढतोस’, असे म्हणत शिवीगाळ करत आरोपींनी तरुणाला बेदम मारहाण केली. सिमेंटचे ब्लॉक डोक्यात मारून तरुणाला जिवे मारल्याचे समोर आले.

चौकातून तरुणाने बायकोला व्हिडिओ कॉल केला. तो आपलाच व्हिडिओ काढतो आहे, असा संशय आला. या संशयातूनच आरोपींनी तरुणाला मारहाण करत जिवे मारल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी केलेला व्हिडिओ कॉल तरुणाच्या जिवावर बेतला असल्याचे यावरून स्पष्ट झाले.