Ahmednagar Crime : पिकअप मागे घेत असताना जोराची धडक बसल्याने येथे एका वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
अनुसया संतु पथवे (वय ७५), असे मयत वृद्ध महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन चालक मुलासह त्याचे वडील संदीप विश्वनाथ वाळे (रा. राजूर) या दोघाविरुद्ध राजुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत सिंधुबाई रामनाथ पथवे (वय ४८, रा. राजूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या सासुबाई अनुसया संतु पथवे तीन महिन्यापूर्वी १३ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास डॉ. भोकनळ यांच्या रुग्णालयात बरे वाटत नसल्याने उपचारासाठी चालल्या होत्या.
त्यांना दम लागल्याने त्या संदीप वाळे यांच्या वेल्डिंगच्या दुकानासमोरील बदामाच्या झाडाच्या सावलीखाली बसल्या होत्या. त्यावेळी वाळे यांची (एम. एच. १७ बी.डी. ७०६) क्रमांकाची पिकअप सर्वोदय राजूर येथील यांच्या वेल्डिंग दुकानासमोर उभी होती.
तेव्हा त्यांचा मुलगा सदरची गाडी मागे घेताना अनुसया यांच्या पायावरून व कमरेवरून गेल्याने त्या जबर जखमी झाल्या होत्या. त्यांना पुढील उपचाराकरता अकोले येथील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.
तीन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना बरे वाटल्यानंतर १६ जून २०२३ रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर राजुर येथील डॉ. भोकनळ यांच्याकडून वेळोवेळी औषधोपचार करून त्यांच्या जखमांना मलमपट्टी करीत होते. (दि.२६) जून २०२३ रोजी पहाटे पाच वाजता अनुसया पथवे या मयत झाल्या.
त्यामुळे अनुसया पथवे यांचा मृत्यू पिकअपच्या धडकेत जखमी झाल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान झाला. आमचे कुटूंब त्यांच्या मृत्यूच्या दुःखात असल्याने सदर फिर्याद देण्यास उशीर झाला.
अखेर काल बुधवारी (दि.13) सप्टेंबर 2023 रोजी राजूर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यात आली आहे. त्यावरुन पोलिसांनी संदीप विश्वनाथ वाळे त्यांचा अल्पवयीन चालक मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.