क्रेडिट कार्डचे लिमिट वाढले म्हणून व्हेरिफिकेशनसाठी कॉल आला अन् झाली लाखाची फसवणूक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- क्रेडिट कार्डचे लिमिट वाढविण्यासाठी आलेल्या मोबाईल कॉलवर ओटीपीची माहिती सांगितल्याने खात्यातून 99 हजार 274 रूपये गेल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात औदुंबर सुभाष राऊत (रा. बेलापूर ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आराध्या शर्मा नावाच्या महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 27 डिसेंबर 2021 रोजी औदुंबर राऊत यांना त्यांच्या मोबाईलवर एक कॉल आला.

क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधून आराध्या शर्मा बोलत आहे, तुमच्या क्रेडिट कार्डचे लिमिट वाढले असून व्हेरिफिकेशनसाठी कॉल केला असल्याचे राऊत यांना सांगितले.

क्रेडिट कार्डचे लिमिट वाढणार असल्याने राऊत यांनी त्या कॉलला प्रतिसाद दिला. मोबाईलवर आलेल्या दोन ओटीपीची माहिती त्यांनी समोरून बोलणार्‍या शर्मा नावाच्या महिलेला दिली.

यानंतर काही वेळातच राऊत यांच्या खात्यातून 99 हजार 274 रूपये कट झाल्याचे त्यांना कळले. याप्रकरणी राऊत यांनी गुरूवार, 13 जानेवारी 2022 रोजी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी राऊत यांना आलेल्या मोबाईल कॉलवरून बोलणार्‍या आराध्य शर्मा नावाच्या महिलेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News