अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- शेत जमीनीचा ताबा न सोडता, जागा विक्रीस अडथळा आणून जीवे मारण्याची धमकी देणार्या व खोटा खरेदीखताचा दस्त बनवून विक्री करण्याच्या प्रयत्न करीत असलेल्या
गांजा विक्रीचे अनेक गुन्हे दाखल असलेल्या शहरातील जुना बजार येथील त्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी जागा मालक सलीम कमरुद्दीन काझी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

तर सदर व्यक्ती जागेपोटी खंडणी मागत असल्याचा आरोप काझी यांनी केला आहे. सलीम कमरुद्दीन काझी (सध्या रा.मीरा भाईंदर रोड, ठाणे) यांची मौजे पेडगावला (ता. श्रीगोंदा)गट नंबर 482/2 मध्ये 2.00 हे. आर क्षेत्रात शेत जमीन आहे. जमीनीच्या सातबारावर त्यांच्या मालकिची नोंद आहे.
लांब राहत असल्याने त्यांनी ही शेत जमीन शहरातील जुना बाजार येथील त्यांच्या नातेवाईकास कसण्यास व देखभालीसाठी दिली होती. या शेत जमीनीतून मिळणारा मोबदला दोघांमध्ये समान वाटून घेण्याचे ठरले होते. परंतु उत्पन्न निघाल्यानंतर सदर व्यक्तीने फसवणुक करुन सन 2007 पासून कोणत्याही प्रकारचा मोबदला काझी यांना दिला नाही.
मोबदल्यासाठी तगादा लावला असता गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने काझी यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. त्या विरोधात 8 ऑक्टोबर 2013 रोजी श्रीगोंदा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसात तक्रार केल्याचा राग येऊन सदर व्यक्तीचा मेहुणा व त्याच्या इतर चार ते पाच साथीदारांनी काझी
यांना त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या जागेत येण्यास मज्जाव केला आहे. या शेत जमीनीवर आल्यास जीवे मारण्याची धमकी सदर व्यक्ती देत आहे. आर्थिक अडचण असल्याने काझी यांनी स्वत:च्या मालकीची शेत जमीन विक्रीस काढली असता, जागेवर ताबा असलेला गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती व त्याचा मेहुणा याने ही जमीन विकल्यास जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
जागा घेऊ इच्छिणार्या व्यक्तीस जमीन पहाण्यासाठी आनले असता सदर व्यक्तींकडून धमकाविणे शिवीगाळ करण्याचे प्रकार घडत आहे. हा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती जमीन बळकाविण्याच्या उद्देशाने जमीनीवरचा ताबा सोडण्यास तयार नाही. त्याच्यावर शहरात गांजा विक्री करण्याचे गुन्हे देखील दाखल आहेत.
अनेक वेळा कोतवाली पोलिसांनी त्याच्या घराजवळ छापा टाकून त्याला व त्याकडील गांजाचा मुद्देमाल देखील हस्तगत केलेला आहे. तीन वर्षापुर्वी त्याने जागा मालक असलेले काझी यांना डांबून ठेऊन कोर्या कागदावर सह्या देखील घेतल्या होत्या.
हा व्यक्ती गुंडप्रवृत्तीचा असल्याने त्याच्यापासून जिवितास धोका निर्माण झाला असल्याचे सलीम काझी यांनी निवेदनात म्हंटले आहे. शेत जमीनची जागा बळकावण्यासाठी त्याने प्रयत्न चालवला असून, जागेचे खोटे कागदपत्र बनवून त्याची विक्री देखील करण्याचा त्याचा प्रयत्न सुरु आहे.
जागेचा ताबा सोडण्यासाठी त्याने 2020 मध्ये काही रकमेची मागणी करुन शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर तजडोड पत्र लिहून दिले. मात्र पुन्हा जागेचा ताबा सोडण्यास त्याने नकार दिला आहे. सदर व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, तो वारंवार शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देत आहे.
तसेच जागेसाठी खंडणी मागत असून, शेतामध्ये जाण्यास मज्जाव करीत असल्याचा काझी यांचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांनी 7 सप्टेंबर रोजी सदर व्यक्तीविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला अदखपात्र गुन्हा दाखल केला आहे. सदर व्यक्तीवर कारवाई होण्यासाठी काझी यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम