Ahmednagar Crime : १० लाखांची खंडणी दिली नाही म्हणून राहुरी तालुक्यातील एका व्यापाऱ्याला पहाटेच्या दरम्यान शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न नुकताच झाला. तसेच खंडणी दिली नाहीतर कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी देण्याऱ्या चार आरोपींना एलसीबीच्या पथकाने अखेर गजाआड केले आहे.
पोलिसांनी आरोपींना काल सोमवारी (दि.२९) राहुरी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील अक्षयकुमार सुरेशचंद मुथ्था या कांदा व्यापाऱ्यांला (दि.२०) मार्च रोजी फोनवरुन तुझ्या मुलीस सुखरुप पहायचे असेल तर ५ लाख रुपये खंडणी द्यावी लागेल. असा फोन आला होता.
त्यावेळी मुथ्था यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर (दि. २५) एप्रिल रोजी पहाटे ५.३० वाजता अक्षयकुमार मुथ्था हे व्यायामासाठी घरातून बाहेर गेले होते.तेव्हा अनोळखी चार आरोपींनी धारदार शखाचा धाक दाखवून मुथ्था यांच्या डोळ्यात कोणतातरी स्प्रे मारला.
आणि त्यांच्या हाथातील सोन्याच्या अंगठ्या काढुन घेण्याचा प्रयत्न केला. तसेच खंडणी दिली नाहीतर परिवाराला संपवुन टाकण्याची धमकी दिली. वेळोवेळी खंडणीसाठी फोन करुन आम्हीच तुझ्यावर हल्ला केला. आता तुला १० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
या घटनेबाबत अक्षयकुमार मुथ्था यांनी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नुकताच दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वांबोरी परिसरात व तालुक्यातील व्यापारी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गणेश भिगारदे, रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, संदीप दरंदले, फुरकान शेख, जालींदर माने,
उमाकांत गावडे यांच्या पथकाने गुप्त खबर व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे (दि.२८) एप्रिल रोजी पांढरीपुल येथे छापा टाकून नागेश चिमाजी देवकर व शशिकांत युवराज सुखदेव या दोघांना ताब्यात घेतले.
त्यांना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबूली देऊन इतर दोन साथीदारांची नावे सांगितली. तेव्हा पोलीस पथकाने बबलु रामदास कुसमुडे व संदीप रामदास कुसमुडे या दोघांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलीस पथकाने नागेश चिमाजी देवकर (वय २८, रा. राहुरी वेस, वांबोरी), शशिकांत युवराज सुखदेव (वय २५, रा. शिक्षक कॉलनी, पढेगाव रोड, बेलापूर), हल्ली रा. सुभाषनगर, वांबोरी, बबलु रामदास कुसमुडे (वय ३०) व संदीप रामदास कुसमुडे (वय ३५, दोघे रा. राहुरी वेस, वांबोरी), या चार जणांना ताब्यात घेऊन गजाआड केले.