८ जानेवारी २०२५ राहुरी : राहुरी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृतदेह सापडण्याचे सत्र सुरूच आहे.काल मंगळवारी (दि. ७) सकाळी तालुक्यातील आरडगाव परिसरात मुळा नदीपात्रात पुन्हा एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळुन आल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील राहुरी आरडगाव येथील स्मशानभूमी जवळील मुळा नदीपात्रात काल सकाळी दहा वाजेच्या दरम्यान, सुमारे ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह नदी पात्रात पाण्यावर तरंगताना दिसून आला.स्थानिक नागरीकांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, हवालदार प्रवीण खंडागळे, संभाजी बडे, रोहित पालवे, चालक शकुर सय्यद आदी पोलीस पथक तसेच सरपंच रविंद्र म्हसे, पोलीस पाटील लक्ष्मण जाधव यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक तरुण व रुग्णवाहिकेचा चालक सचिन धसाळ यांच्या मदतीने मृतदेह नदीपात्रातील पाण्यातून बाहेर काढला.
मृतदेह पाण्यात राहिल्यामुळे पूर्णपणे फुगलेल्या अवस्थेत असून मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुर येथे सुमारे सहा महिन्यापूर्वी एका अनोळखी इसमाचा मृतदेह हाथपाय बांधून एका छोट्या ड्रममध्ये कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता.
तर गेल्या १५ दिवसांपूर्वी राहुरी देसवंडी शिव परिसरात मुळा नदीपात्रात एका अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता. बारागाव नांदुर व राहुरी देसवंडी शिव परिसरात आढळून आलेल्या दोन्ही मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसल्याने दोन्ही तपासाला खीळ बसली.आज पुन्हा एक मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात मृतदेह सापडण्याचे सत्रच सुरु असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.मात्र या घटनेमुळे तालुक्यात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे.