७ मार्च २०२५ अहिल्यानगर : शहरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयामागील गॅलेक्सी बिल्डिंगमध्ये घुसून तीन महिला व एक पुरुषाने २८ हजार रुपयांच्या साहित्याची चोरी केली. ही घटना १ मार्च रोजी सकाळी घडली. याबाबत चार जणांवर बुधवारी (दि.५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जीनत बेगम जीशान सय्यद (रा. गॅलेक्सी बिल्डींग, नवीन कलेक्टर ऑफिस मागे, अ.नगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी जीनत सय्यद या त्यांच्या पतीचे ऑफिस असलेल्या गजराज नगर येथे गेल्या होत्या. तेथून त्या माघारी आल्या असता

त्यांना त्यांच्या घराखाली त्यांच्या ओळखीच्या तबस्सुम खलील शेख, (रा. दगडी चाळ मुकुंदनगर) हिना जाहीर शेख, सना सत्तार पठाण, सत्तार अब्दुल पठाण (तिघे रा. शादवल दर्गा, रामचंद्र खुंट, झेंडीगेट) हे रिक्षा घेऊन थांबलेले दिसले व फिर्यादी येताच त्याच्या रिक्षात दोन सुटकेस व घरगुती वापरातील भांडी ठेवून घाईघाईत रिक्षामध्ये बसून निघून गेले.
फिर्यादी जीनत यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांच्या घरातील दोन हजार रुपये किमतीच्या दोन सुटकेसमध्ये ठेवलेले ड्रेस व इतर कपडे, ११ हजार रुपये रोख रक्कम, १० हजार रुपये किमतीचा मोबाईल, ५ हजार रुपये किमतीचे घरगुती वापरतील भांडे असे २८ हजार रुपयांचे साहित्य चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी जीनत सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चौघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.