Ahmednagar News: तू आमच्या विरोधात पोलिसांत तक्रार का द्यायला सांगितली. असे म्हणत पाच जणांनी फिल्मी स्टाईलने दहशत निर्माण करत चॉपर व तलवारीने दोघांवर जीवघेने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
ही घटना राहाता येथे घडली असून याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संदीप निकाळे याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे, दि.१ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास मी व माझा चुलतभाऊ रमाकांत असे दोघे राहाता ते चितळी रोडच्याकडेला असलेल्या म्हसोबा मंदिराजवळ सप्तश्रृंगी किराणा दुकानासमोर उभे होतो.
त्यावेळी तेथे तुषार भोसले, अक्षय पगारे, रोहीत पगारे, बाबू जाधव व भैय्या रोहोम असे हातामध्ये तलवार, कोयते, लोखंडी रॉड, काठ्या घेऊन आले. रमाकांत यास म्हणाले, काल रात्री आदेश कोळगे यास आम्ही मारले तेव्हा तू त्याला फिर्याद देण्यास का सांगितली.
रमाकांत त्यांना म्हणाला, मी कशाला त्यांना फिर्याद देण्यास सांगू. त्यानंतर त्यांनी आम्हास शिवीगाळ, दमदाटी करून तुषार भोसले म्हणाला, याला जिवंत कशाला सोडता. त्याच्या हातातील कोयत्याने रमाकांत यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले.
मी सोडवू लागलो असता बाबु जाधव याने त्याच्या हातातील तलवारीने मला ठार मारण्याच्या उद्देशाने माझ्यावर वार केला. परंतु मी हुकवण्याचा प्रयत्न केला असता तो माझ्या डाव्या पायाच्या मांडीवर लागून मी जखमी झालो. तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या अक्षय पगारे, रोहीत पगारे यांनी त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने माझ्या उजव्या हातावर व डाव्या बरगडीजवळ मारहाण केली.
भैय्या रोहोम याने त्यांच्या हातातील काठीने मला व रमाकांत यास मारहाण केली. आम्ही आरडाओरड केली असता लोक जमा होऊ लागले. परंतु त्यांनी मोठ्याने आरडाओरड करून दहशत निर्माण केली. त्यांना घाबरून परिसरातील दुकानदारांनी दुकाने बंद केली. जमा झालेले लोकही त्यांच्या दहशतीने सैरावैरा पळून गेले. या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.