११ फेब्रुवारी २०२५ पाथर्डी : बारावीची परीक्षा सुरू होण्यापूर्वीच राज्यभरातील ‘ढ’ गोळ्यांसाठी कॉपी पुरवून हमखास पासिंगचा फॉर्म्युला राबवणाऱ्या तालुक्यातील ठराविक शिक्षण संस्थांसह हॉटेल, लॉज, बिअरबार या व्यवसायांना चांगले दिवस आले आहेत.या सर्व गैरप्रकारामुळे मात्र स्थानिक अभ्यासू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारकारमय झाले आहे.या सर्व बाबींचा खरपूस समाचार घेणारे पोस्टर शहरातील चौकाचौकांत लागले आहेत.पोस्टर लावून कॉपीबहाद्दर शिक्षणसम्राटांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
१० वी व १२ वी परीक्षेसाठी पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रांतून हजारो परीक्षार्थी परीक्षा देत आहेत.शहरासह तालुक्यात १२ वीची परीक्षा सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांनी हॉटेल व लॉज फुल्ल झाले आहेत. तालुक्यातील बारावीच्या परीक्षा केंद्रांमधून फक्त उत्तीर्ण होण्यासाठी प्रवेश घेतलेल्या जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांना कॉपी पुरवून भरघोस गुणांनी पास करून देण्यासाठी गेल्या चार वर्षापासून लाखो रुपयांची उलाढाल होत असलेले कॉपीचे रॅकट जोमात सुरू आहे.या गैरप्रकाराकडे पुणे बोर्डासह जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे सोईस्कर दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक अभ्यासू विद्यार्थ्यांचे मात्र फार मोठे नुकसान होत आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-76.jpg)
दहावी बारावीच्या परीक्षेत शेकडो ढ विद्यार्थ्यांना चांगल्या गुणांनी पास करण्यासाठी तालुक्यातील काही निवडक संस्थांमधून शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने वर्षभरातील उपस्थिती व अभ्यासक्रमांच्या सोपस्काराला फाटा देवून प्रती विद्यार्थी २० ते ५० हजार रुपयांपर्यंतच्या अर्थपूर्ण तडजोडीतून कागदोपत्री घोडे नाचवत सोईस्करपणे प्रवेश देऊन १२ वीच्या परीक्षेला बसवले जाते.मात्र, यामुळे तालुक्यातील स्थानिक अभ्यासू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य खराब होत आहे.
पुणे, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, बीड, नाशिक, रायगड, या ठिकाणांहून एजंटांमार्फत हमखास पास होण्याच्या खात्रीवर प्रती विद्यार्थ्यांकडून पन्नास हजार ते एक लाख रुपये घेऊन खास कॉपी पुरवण्यापासून ते राहण्या खाण्याची सोय करण्यापर्यंत एजंटाची यंत्रणा राबत असते.शिक्षण संस्थाचालक यांच्या घरी अशा बाहेरील विद्यार्थ्यांसाठी खानावळी व राहण्याची सोय देखील करण्यात आली आहे.कॉपी रेकेट उघड झाल्यानंतर जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांना तालुक्यात प्रवेश दिला जाणार नाही, असे यापूर्वी अनेकदा ठासून सांगितले होते.
परंतु आजही जिल्ह्याबाहेरील हजारो विद्यार्थ्यांचे बेकायदा प्रवेश झाले असून, यासाठी शैक्षणिक वर्ष व परीक्षा सुरू होण्याआधी कॉपी रकेट चालवणाऱ्या संस्थाचालकांची शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांसोबत गोपनीय बैठक झाल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात आहे.गेल्या चार वर्षात शिक्षण विभागाने जिल्ह्याबाहेरील हजारो विद्यार्थ्यांना तालुक्यातील ठराविक संस्थांमधून प्रवेश दिल्याबाबत सामाजिक कार्यकत्यांनी तक्रारी केल्या आहेत.
परीक्षा देण्यासाठी जिल्ह्याबाहेरून आलेले ऐन पस्तिशीतील युवक युवती रात्री परमिट रूम, पान टपऱ्या बाजार पेठ, या भागात फिरताना आढळून येत आहेत. नियमांचे उल्लंघण करून लॉजवर मुले-मुले यांचा खुलेआम वावर आहे.परीक्षा केंद्राबाहेर जिल्ह्याबाहेरील पासिंगच्या अलिशान गाड्यांची गर्दी होत असून, जिल्ह्याबाहेरील विद्याथ्यांमुळे तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा खालावला आहे, त्यामुळे स्थानिक अभ्यासू विद्यार्थी स्पर्धेत मागे पडून मोठा अन्याय होत आहे.
यासर्व बाबींचा पंचनामा करणारे पोस्टर सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील चौका चौकांत लावले असून, स्थानिक विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ याबाबत शिक्षणमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेटणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अॅड. हरिहर गर्जे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी पाथर्डी तालुक्यासाठी कॉपी विरुद्ध एखादे पथक तयार करून कडक कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. श्री. येरेकर यावर नियंत्रण आणणार का ? तुम्ही केवळ खमकी भूमिका घ्या.जनतेचा आशीर्वाद तुमच्यासोबत राहील.हे कॉपीचे रॅकेट उद्ध्वस्त करा, शैक्षणिक क्षेत्रातील पैसे खाऊ प्रवृत्ती नाहिशी होईल.