Ahmednagar Crime : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहित तरुणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे नुकतीच घडली. तरुणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासरच्या चार लोकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा राहुरी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण दत्तु बर्डे ( वय ४२, रा. कणगर, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, लक्ष्मण बर्डे यांच्या मुलगी राणी हिचे लग्न राहुरी तालूक्यातील वांबोरी येथील गणेश सुरेश माळी याच्या बरोबर २०२२ मध्ये झाले होते.
लग्नानंतर सुमारे तिन महिन्यानंतर राणी हिचा पती, सासरा, सासु व दिर हे राणी हिच्या चारीत्र्यावर संशय घेऊन तीला उपाशी पोटी ठेवत असे. तसेच वारंवार शिविगाळ व मारहाण करुन छळ करीत असे.
सासरच्या लोकांकडून वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून राणी या विवाहित तरुणीने (दि. ३०) सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी तीच्या सासरच्या घरी वांबोरी येथे विषारी औषध प्राशन केले. तीची प्रकृती गंभीर झाल्याने तीला अहमदनगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
(दि. १) ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी राणी हिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. राणी हिचा सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ करुन तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची खात्री झाल्यानंतर मयत राणी हिचे वडील लक्ष्मण दत्तु बर्डे (रा. कणगर, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती गणेश सुरेश माळी, दिर दिनेश सुरेश माळी, सासरा सुरेश माळी, सासु मंगल सुरेस माळी (सर्व रा. वांबोरी, ता. राहुरी) या चार जणांवर शारीरिक व मानसिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.