बापरे! कामगारांनी कंपनीतून चोरले एक कोटी १८ लाखांच्या प्लास्टिक वस्तू; दोघे जेरबंद, तिघे पसार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  नागापूर एमआयडीसी येथील कंपनीतील एक कोटी १८ लाख ८१ हजार १८ रूपयांच्या प्लास्टिक वस्तूंचा अपहार करणार्या दोन नोकरदारांना एमआयडीसी पोलिसांनी सांगली जिल्ह्यातून अटक केली.

अनिकेत अशोक माळी (वय २३), आतिष विष्णू माळी (वय २७ दोघे रा. कवलापूर ता. मिरज जि. सांगली) अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

नागापूर एमआयडीसीत दर्शन ब्रिजलाल सोनी (वय ५६ रा. बुरूडगाव रोड, अहमदनगर) यांची विवेक पाॅलीप्राॅडक्ट कंपनी व तिचे गोडाऊन आहे.

आरोपी त्या कंपनीत नोकरी करत असताना १ जून २०२० ते ७ डिसेंबर २०२१ दरम्यान वेळोवेळी त्यांनी टेम्पो मध्ये कंपनीतील एक कोटी १८ लाख ८१ हजार १८ रूपयांच्या प्लास्टिक वस्तू घेऊन जात सोनी यांची फसवणूक केली.

याप्रकरणी दर्शन सोनी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एकुण पाच जणांविरुद्ध १७ डिसेंबर २०२१ रोजी फिर्याद दिली होती.

चार आरोपी सांगली जिल्ह्यातील असल्याने सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नितीन उगलमुगले, किशोर जाधव, राजेश राठोड यांनी सांगली जिल्ह्यात जाऊन आरोपींचा शोध घेतला.

आरोपी अनिकेत व आतिष माळी यांना ताब्यात घेत अटक केली. या गुन्ह्यातील आरोपी सागर मोहन तुपे (रा. मुकुंदनगर, अहमदनगर), सतिष विष्णू माळी व विष्णू शंकर माळी (दोघे रा. कवलापूर) अद्याप पसार असून

पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून एक पेन ड्राईव्ह, ३८ हजार रूपये किंमतीचे प्लास्टिकचे घमेले व पाच लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा मुद्देमाल जप्त केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe