१५ जानेवारी २०२५ जेऊर : छत्रपती संभाजी नगर महामार्गावर सुरू असलेल्या अपघातांची मालिका थांबता थांबेना.दररोज घडत असलेल्या अपघातात अनेक निष्पापांचे बळी जात आहेत.गेल्या दहा दिवसात जेऊर ते इमामपूर घाटा दरम्यान झालेल्या अपघातात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
यामुळे जेऊर परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.याबद्दल सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर महामार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे.येथे दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत.
महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे अन् सार्वजनिक बांधकाम विभागाचे झालेले दुर्लक्ष झाल्यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.पांढरीपूल, खोसपुरी परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा मागणी करून देखील त्यांच्या मागण्याकडे पूर्णता दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही नागरिक करत आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून जेऊर येथील महावितरण कंपनी चौक ते इमामपूर घाट अवघ्या चार किलोमीटरच्या अंतरावरच झालेल्या वेगवेगळ्या अपघातात पाच निष्यापांचे बळी गेले आहेत.तर काहींना अपंगत्व आले आहे.अनेक निष्पापांचे बळी जाऊन देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येत नसेलतर तीव्र आंदोलन करावेच लागेल असा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे.
इमामपूर येथील प्रकाश साळवे या तरुणाचा महावितरण कंपनीच्या चौकात झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे.तसेच इमामपूर येथे झालेल्या अपघातात रखमाजी मोकाटे यांचाही मृत्यू झाला आहे.इमामपूर येथीलच अण्णासाहेब मोकाटे या तरुणाचा देखील पांढरीपुल एमआयडीसी परिसरात झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे.इमानपुर घाटातच ढोरजळगाव येथील दोन जणांचा तर माका परिसरातील एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
तसेच इमामपूर येथीलच रभाजी टिमकरे यांनाही अपघातात अपंगत्व आले आहे.छत्रपती संभाजी नगर महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला असून गजराज नगर चौक, शेंडी बायपास चौक, धनगरवाडी, गवारे वस्ती चौक, जेऊर मुख्य चौक, महावितरण कंपनी चौक, इमामपूर चौक, पांढरीपुल धाट हा परिसर अपघातांसाठी अत्यंत धोकादायक बनला असून येथे दररोजच लहान-मोठे अपघात घडत आहेत.
धोकादायक चौकात सिग्नल लाईट, रिफ्लेक्टर, झेब्रा क्रॉसिंग पट्टे, सूचना फलक व इतर उपाय योजना करण्याची मागणी वारंवार करून देखील नागरिकांच्या मागणीला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात येत आहे.महामार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे पडलेले असून थातूरमातूर पद्धतीने खड्डे बुजविण्यात आलेले आहेत.
खड्डे बुजविल्यानंतर दोनच दिवसात पुन्हा त्याच जागी खड्डे पडत असल्याचा आरोप देखील नागरिकांकडून करण्यात येत आहे.शेंडी, जेऊन, इमामपूर, धनगरवाडी, पांढरीपुल या परिसरातून अनेक शाळेतील विद्यार्थी महामार्गावरून प्रवास करत असतात त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
छत्रपती संभाजी नगर महामार्गावर अपघात टाळण्यासाठी विविध चौकांनी तसेच घाटामध्ये तात्काळ उपाय योजना करण्याची मागणी बहिरवाडी माजी सरपंच विलास काळे, इमामपूर माजी सरपंच भीमराज मोकाटे, शिशुपाल मोकाटे, उल्हास जरे, बाबासाहेब जरे, शरद तोडमल, विकास महस्के, माजी सरपंच अंबादास पवार, रविराज तोडमल, सूरज तोडमल यांच्यासह जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.