अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Crime:- दुचाकीवरून समोर चाललेला व्यक्ती पाठीमागे न पाहताच थुंकला. पाठीमागे असलेल्या तरूणाच्या अंगावर ती थुंकी उडाली.
याचा जाब विचारल्यावरून सात जणांनी तरूणास मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री सव्वा अकरा वाजता कायनेटीक चौकातील जाधव वडेवाले यांच्या दुकानासमोर घडली.
मारहाणीत अक्षय किशोर गुप्ता (वय 30 रा. श्रीकृष्णनगर, केडगाव) हा तरूण जखमी झाला आहे. या प्रकरणी त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी सात जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
अक्षय गुप्ता शुक्रवारी रात्री केडगाव येथून अहमदनगर शहराकडे येत असताना सव्वा अकरा वाजेच्या सुमारास जाधव वडेवाले यांच्या दुकानासमोर समोर चाललेल्या दुचाकीवरील एक जण मागे वळुन न पाहताच उजव्या बाजुला तोंड करून थुंकला.
त्याची थुंकी अक्षय यांच्या अंगावर उडाली. याबाबत अक्षय त्याला म्हणाला,‘ तुला पाठीमागे बघुन थुंकता येत नाही का’, याचा राग आल्याने दुचाकीवरील व्यक्तींनी अक्षय यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
अक्षय त्यांना समजून सांगत असताना सात जणांनी त्यांना मारहाण केली. दरम्यान मारहाणीनंतर त्या व्यक्तींनी एक दुचाकी घटनास्थळी सोडली होती. अक्षय यांनी ती कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिली आहे.
पोलिसांनी दुचाकी (एमएच 17 यु 3144) तिघे व त्यांचे ओळखीचे चौघे अशा सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.