देवळाली प्रवरा येथे विहिरीत अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ !

Published on -

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील लाख रोड परिसरातील मुसमाडे वस्ती येथे एका विहिरीत अनोळखी तरुणाचा मृतदेह काल रविवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, अनोळखी तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुसमाडे वस्ती येथे सुभाष मुथा यांच्या शेतात स्वमालकीची विहीर आहे.

दुपारच्यावेळी जवळ राहणारे पोटघन यांना सदर विहिरीत पिवळा टी-शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेल्या अवस्थेत अनोळखी तरुणाचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्यांनी सदर माहिती माजी नगरसेवक डॉ. संदीप मुसमाडे यांना दिली.

घटनास्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार विष्णु आहेर यांनी धाव घेऊन पंचनामा केला. या ठिकाणी विहिरीत तरंगलेल्या अवस्थेत मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह छत्रपती प्रतिष्ठान, साई प्रतिष्ठानच्या सदस्यांनी व मुसमाडे वस्ती येथील नागरिकांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले. सदर मृतदेह रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे व पप्पू कांबळे यांच्या मदतीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe