१५ जानेवारी २०२५ संगमनेर : जेवणाचे बिल देण्याच्या कारणावरून तालुक्यातील साकूर येथील हॉटेलमध्ये हाणामारी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.याप्रकरणी घारगाव पोलिसांनी १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने साकूरमध्ये अर्धा दिवस बंद पाळण्यात आला.याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील साकूर येथील हॉटेल आसरामध्ये सोमवारी सायंकाळी दोघेजण जेवण करण्यासाठी आले होते.
यावेळी हॉटेलचे मालक अजिज सय्यद व त्यांचा मुलगा हॉटेलवर थांबलेले होते.जेवणाच्या बिलावरुन दोघांनी त्यांच्या सोबत वाद घातला.या ठिकाणी हनुमंता सोन्नर आला.तुम्ही त्या दोघांना सोडून द्या, नाहीतर त्याचे वाईट परिणाम होईल, अशी धमकी सोन्नर याने दिली. त्याने फोन करुन त्याच्या मित्रांना बोलावून घेतले.
या तरुणांनी हॉटेलमध्ये घुसून काऊंटरमधील २ हजार रुपये काढुन घेतले.सी.सी. टी. व्ही कॅमेऱ्याचा डी.व्ही. आर. काढून घेतला.लोखंडी गजाच्या साह्याने हॉटेल मधील कॅमेरे व हॉटेल मधील साहित्याची तोडफोड करुन नुकसान केले.हॉटेलमधील कामगारांना लोखंडी गजाने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली.
याबाबत अजीज खुदबुद्दीन सय्यद यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.या फिर्यादीवरून पोलिसांनी रोहन भरत पेंडभाजे, बाजीराव खेमनर, अक्षय येरमल, संदीप डोंगरे, ओम इघे, महेश कोळेकर, निखिल खेमनर, सागर खेमनर, सागर सोन्नर, ओम जाधव, सोपान खेमनर, प्रविण कोळेकर, अक्षय दत्तात्रय चोरमले, बंटी थोरात (सर्व रा. साकुर) यांच्यासह दोन अनोळखी इसम अशा एकूण १७ जणांविरुद्ध गु. र.नं. १६/२०२५ नुसार भारतीय न्याय सहिता कलम ११५(२), ११८(१), ११९(१), ३५२, ३५१(२), (३), १८९(२), १९१ (२), १९०, ३२४ (१), प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
हाणामारीची घटना घडल्याचे वृत्त समजतात तरुण मोठ्या संख्येने एकत्र आले.पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.याच्या निषेधार्थ बजरंग दल व इतर संघटनांच्या वतीने साकूरमध्ये दुपार पर्यंत बंद पाळण्यात आला.