अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :- एकाच फ्लॅटची दोघांना विक्री करत नगर शहरातील औरंगाबाद रोडवरील अभियंता कॉलनीत राहणार्या राणी तिम्मराज यांची 15 लाख रूपयांची फसवणूक झाली आहे.
याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणूक करणारा रामहरी मारुती शिरोळे (रा. गुलमोहर रोड, पोलीस चौकी मागे) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामहरी शिरोळे याच्याकडून फिर्यादी यांनी फ्लॅट खरेदी केला होता. त्यासाठी त्यांनी नगरमधील एका बँकेत सोनेतारण कर्ज काढत 10 लाख रुपये रोख शिरोळे यास दिले होते.
त्यानंतर सातबारा उतार्यावर नावाची नोंदणी झाल्यावर पाच लाख रुपये देण्याचे ठरले होते. तसेच नोटरी व साठेखत शिरोळे याने फिर्यादी महिलेस करुन दिले होते.
त्यानंतर खरेदीखत करण्यासाठी शिरोळे याच्याकडे वारंवार पाठपुरावा करुनही त्याने अनेक खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ केली.
त्यानंतर फिर्यादी यांनी सदर जागेवर जावून पाहणी केली असता फ्लॅट पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आलेला त्यांच्या निदर्शनास आला.
त्यानंतर त्यांनी सावेडीच्या तलाठी कार्यालयात जावून सदरील जागेबाबत चौकशी केली असता सदरचा फ्लॅट हा शिरोळे याने यापुर्वीच 3 एप्रिल 2019 रोजी सुभाष विश्वास बाबर नावाच्या व्यक्तीला विकला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
सदर फ्लॅट अगोदरच विकलेला असताना तो दुसर्यांदा विक्री करण्याच्या उद्देशाने नोटरी व साठेखत करुन आपली 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.
या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिसांनी आरोपी रामहरी मारुती शिरोळे यांच्याविरुद्ध भादंवि कलम 406, 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम