Ahmednagar Crime : बेकादेशीरपणे गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विक्री करण्याचा डाव घारगाव पोलिसांनी हाणून पाडल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे घडली.
याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून गावठी कट्टा व ३ जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे काही युवक बेकायदेशीरपणे गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतः जवळ बाळगून असल्याची माहिती घारगाव पोलिसांना समजली.
ही माहिती समजतात घारगाव पोलीस त्वरित मांडवे बुद्रुक येथे गेले. संबंधित युवकांची त्यांनी चौकशी केली असता या युवकांनी आपल्या ताब्यात बेकायदेशीर रित्या गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले. मांडवे बुडुक येथील साकुर, टाकळी ढोकेश्वर रस्त्यावरील संग्राम हॉटेल जवळ पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी या आरोपीकडून २० हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पांढऱ्या धातुचे पिस्तुल २३०० रुपये किंमतीचे एक पांढऱ्या यातूचे मॅक्झिन त्यात तीन जिवंत काडतुसे, असा २२ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त केला.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी संतोष काशीनाथ कुटे (वय ३२, रा. मांडवे बुद्रुक, ता. संगमनेर), शिवाजी बाबुराव कुदनर (वय २७), संतोष शेवराज बर्डे (वय २८, दोघे रा. शिवोडी, ता. संगमनेर) व रणजित बापू धुळगंड (रा. मांडवे बुद्रुक, ता. संगमनेर) या चौघांविरुद्ध रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पतंगे हे करीत आहे.