भयंकर : तिघांनी केला जीवघेणा हल्ला: एकाच्या डोक्याला पडले तब्बल ६२ टाके अन् पाय देखील झाला…

Karuna Gaikwad
Published:

१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : बर्फाचा कारखाना बंद पाडण्याच्या कारणावरून या कारखान्यात कामाला असलेल्या कामगारावर तीन जणांनी दगडाने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये कामगार गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोक्यावर तब्बल ६२ टाके पडले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. विजय ओमप्रकाश चौरासिया असे या हल्ल्यात जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. सदरची घटना जामखेड शहरातील खर्डा रोडवर घडली.

याबाबत पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी की, जामखेड येथील खर्डा रोडवरील दिलीप फुलचंद गांधी यांच्या महावीर बर्फ कारखाना आहे. विजय ओमप्रकाश चौरासिया (रा. पडरोना, जिल्हा कुसीनगर, उत्तरप्रदेश) (हल्ली रा. महावीर बर्फ कारखाना, खर्डा रोड, जामखेड) हा सुमारे ८ वर्षापासुन या कारखान्यात काम करत आहे. गुरूवारी (दि.६) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कारखान्यामध्ये एकटाच काम करत असताना याठिकाणी सुरेश आप्पा क्षीरसागर, शुभम अमृत पिंपळे (दोघे रा.आरोळे वस्ती) व मनोज सुरेश जगताप (रा. म्हाडा कॉलनी, जामखेड) हे तिघेजण त्या ठिकाणी आले.

या तिघांनी काही एक कारण न सांगता चौरासिया यास शिवीगाळ करुन त्यांच्या हातातील दगडाने पायाच्या नढगीवर व डोक्यात जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करु लागले. यावेळी सुरेश आप्पा क्षीरसागर हा म्हणत होता की याचा पाय तोडा जेणे करुन हा काम करणार नाही व कारखान बंद पडेल. असे म्हणत या तिघांनी त्याच्या डोळ्याच्या मागील बाजुस व डाव्या पायाच्या नडघीवर दगडाने जबर मारहाण केली.

मारहाण करतांना चौरासिया मोठमोठ्याने ओरडत असल्याने तेथे जवळ असलेल्या दुकानातील महेश कसबे व अरुण देवकाते हे त्या ठिकाणी आले. मात्र त्यांच्यावरही दगडफेक करून आरोपी तेथुन पळुन गेले. त्यानंतर महेश कसबे यांनी कारखान्याचे मालक दिलीप फुलचंद गांधी यांना सदरचा प्रकार सांगितला. त्यानंतर गांधी यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व पोलिस निरीक्षक महेश पाटील यांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी जखमी कामगारास तातडीने खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या मारहाणीत त्याच्या डोक्यात मागील बाजुस ६२ टाके पडले व डावा पाय नडघीजवळ फॅक्चर झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe