Ahmednagar Crime News : पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : पतीशी पटत नसल्याने माहेरी राशीन येथे राहत असलेल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करत तिला ठार मारल्याप्रकरणी आरोपी राहुल सुरेश भोसले (वय ३३), रा. अजंठानगर, चिंचवड, पुणे,

याला जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सौ. संगीता अनिल ढगे यांनी काम पाहिले तर पोलीस निरीक्षक सतीश गावित यांनी तपास केला.

याबाबतची माहिती अशी की, मयत दिपाली सुरेश भोसले हिचे तिचा पती राहुल सुरेश भोसले याच्याशी पटत नसल्याने ती माहेरी राशीन येथे राहात होती. जून २०२१ मध्ये तिने पतीविरोधात भरोसा सेल, कर्जत येथे दिलेल्या शारीरिक व मानसिक छळाच्या तक्रारीवरून आरोपीविरुध्द कर्जत पोलीस ठाण्यात छळाचा गुन्हा दाखल होता.

दि.२२ ऑक्टोबर २०२१ रोजी आरोपी पत्नीला भेटण्यासाठी राशीन येथे गेला. तेथे आरोपीने पत्नीस दीपाली हीस मोबाईल मागितला; परंतु तिच्याकडे त्याचा मोबाईल नसल्याने त्याने तिला चापट मारत त्याच्याजवळील चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार केले. जखमी झाल्याने ती जमिनीवर पडली, तिची बहीण तिला वाचवण्यासाठी गेली असता, आरोपीने तिच्यावरही हल्ला करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

जखमी दीपाली हिला दवाखान्यात नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी लता बारकु उर्फ गंगाराम आढाव रा. राशिन यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात दि.२२ ऑक्टोबर २०२१ रोजी भा.दं. वि. कलम ३०२ , ३०७, ३२३ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलीस निरिक्षक सतीश गावित व डी. एस. मुंडे यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सदर खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांच्या न्यायालयात झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण सोळा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, साक्षीदार, वैद्यकीय अधिकरी, तपासी अधिकारी व पंच यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सौ. संगीता अनिल ढगे यांनी काम पाहिले. न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व सरकारी अभियोक्त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी राहुल सुरेश भोसले याला

पत्नीस ठार मारल्याप्रकरणी दोषी धरत भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप तसेच ५ हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास ६ महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली तसेच भादंवि कलम ३२४ अन्वये २ वर्षे कैदेची शिक्षा व १००० दंड, दंड न भरल्यास १ महिन्याची साध्या कैदेची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी सौ. आशा खामकर यांनी सहकार्य केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe