तू मला खूप आवडतेस, माझ्याशी बोल, मला फोन करत जा…. तिच्यासाठी त्याने महाविद्यालयात प्रवेशही घेतला मात्र पुढे घडले असे काही

Published on -

२९ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अलीकडे महाविद्यातयात शिक्षण घेणयाऐवजी भलतेच प्रकार घडत आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या छेडछाडीच्या घटना वारंवार होत आहेत. बऱ्याच वेळा मुली भयभीत होवून असे प्रकार कुटुंबियांना सांगत नाहीत. असाचा प्रकार नगर तालुक्यातील एका महाविद्यालयात घडला आहे. या रोडवरील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील १७ वर्षीय मुलीचा वारंवार पाठलाग करत तिची छेडछाड करणाऱ्या तरुणावर नगर तालुका पोलिसांनी विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. मनीष सुनिल लबडे (रा.पाथर्डी) असे या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील एका गावात राहणारी अल्पवयीन मुलगी नगर जामखेड रोड वरील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती महाविद्यालयाजवळच असलेल्या मुलींच्या होस्टेल मध्ये राहते. मनीष लबडे हा गेल्या अनेक दिवसांपासून त्या मुलीला त्रास देत होता. तू मला खूप आवडतेस, माझ्याशी बोल, मला फोन करत जा, असे म्हणून तो तिला त्रास द्यायचा. तिचा वारंवार पाठलाग करायचा. इतकेच नव्हे तर त्याने तिच्याच महाविद्यालयात प्रवेशही घेतला होता.

मात्र त्याच्याकडून दिवसेंदिवस होणाऱ्या त्रासाबाबत सदर मुलीने तिच्या वडिलांना माहिती दिली होती. तिच्या वडिलांसह इतर नातेवाईकांनी मनीष लबडे व त्याच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यास समजून सांगितले होते.तरीही त्याचे त्रास देणे सुरूच होते. नोव्हेंबर २०२४ मध्ये तर तू कॉलेज मधील इतर मुलांशी का बोलतेस असे म्हणून त्याने तिला मारहाणही केली होती. त्यावेळी ही मुलीच्या नातेवाईकांनी त्याला समज दिली होती. असे असताना २७ जानेवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास लबडे हा महाविद्यालय परिसरात तोंड बांधून आला व त्याने त्या मुलीचा पाठलाग करत पुन्हा तिची छेड काढली.

हा प्रकार मुलीने तिच्या वडिलांना सांगितला. तिचे वडील व इतर नातेवाईक तातडीने नगरला आले.त्यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात जावून सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला. स.पो.नि. गिते यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आणि त्या आरोपीकडून वारंवार त्रास दिला जात असल्याने सदर मुलीची फिर्याद नोंदवून घेत आरोपी मनीष लबडे याच्या विरुद्ध पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News